नशिराबादनजीक काळ्या बाजारात जाणारा रेशनचा आठ लाखांचा तांदुळ जप्त
पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलिसांची कारवाई
Ration rice worth eight lakhs going to black market seized near Nasirabad नशिराबाद : धरणगाव येथून गोंदियाकडे ट्रकमध्ये जाणारा सुमारे आठ लाख रुपये किंमतीचा रेशनचा तांदुळ नशिराबाद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पकडल्याने रेशन तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना धरणगावहून गोंदियाकडे ट्रकमध्ये रेशन मालाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक रामकृष्ण मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे हवालदार सुरज पाटील यांनी नशिराबादपासून ट्रक (एाम.एच.18 बी.झेड.1039) चा पाठलाग केल्यानंतर नशिराबादपासून काही अंतरावर ट्रक अडवला असता चालकाकडे रेशन मालाच्या वाहतुकीबाबत कुठलीही कागदपत्रे नसल्याने हा ट्रक नशिराबाद पोलिस ठाण्यात आणण्यात आला. ही कारवाई मंगळवारी रात्री 11 वाजता करण्यात आली.

रेशन माफियांची टोळी सक्रिय
नशिराबाद पोलिस ठाण्यात ट्रकमधील तांदळाची मोजणी केल्यानंतर त्यात 29.5 टन वजनाचा व बाजारभावानुसार सुमारे आठ लाख रुपये किंमतीचा तांदुळ असल्याचे स्पष्ट झाले. अन्न व पुरवठा अधिकार्यांकडून पंचनामा करण्यात आला असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, जिल्ह्यात रेशन माल काळ्या बाजारात नेणारी टोळी मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून कारवाईची अपेक्षा आहे.

