भरधाव आयशरने दुचाकीला उडवले : नायगावचा युवक ठार : जमावाकडून वाहनाची तोडफोड
Rushing Eicher blew up the bike : Youth of Naigaon killed : Vehicle vandalized by mob यावल : यावल तालुक्यातील नायगाव येथील किनगाव रस्त्यावरील स्मशानभूमी जवळ आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने नायगावातील 37 वर्षीय तरुण दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार होता असताना ग्रामस्थांनी रस्त्यातच त्यास अडवत वाहनाची तोडफोड केली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन व वाहन चालक यास ताब्यात घेतले. याप्रकरणी यावल पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असा घडला अपघात
नायगाव, ता.यावल येथील किनगाव रस्त्यावरील स्मशानभूमीनजी गुरुवारी दुचाकी (क्रमांक एम. एच.19 यु. 0864) वरून परशुराम प्रभाकर कोळी (37, रा.नायगाव, ता.यावल) हे नायगाव येथून किनगावकडे जात असताना त्याचवेळी आयशर (क्रमांक एम.एच.17 बी.डी.0080) घेऊन चालक इमरान खान रसूल खान (साकळी, ता.यावल) हा नायगाव गावाकडे जात असताना त्याने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातामध्ये परशुराम कोळी हा जागीच ठार झाला तर अपघातानंतर इमरान खान याने वाहन घेऊन नायगावच्या दिशेने पळ काढला. दरम्यान, ग्रामस्थांनी वाहन थांबवत वाहनाची तोडफोड करीत चालकाला चोपले.


आयशर चालकाविरोधात गुन्हा
यावल पोलिसांनी वाहन चालक आणि वाहन ताब्यात घेतले. मयत परशुराम कोळी यांच्या मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबांना सोपवण्यात आला. याप्रकरणी यावल पोलिसात चंद्रभान सुधाकर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक फौजदार असलम खान करीत आहे. मयत परशुराम कोळी यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी असा परीवार आहे.
