वेध दुर्गोत्सवाचे : भुसावळात पहिल्याच दिवशी 54 मंडळांनी नेले अर्ज
दुर्गोत्सवासाठी एक खिडकी योजना ; धर्मदाय आयुक्तांची ऑनलाइन एनओसी लागणार
Vedha Durgotsava: Applications were taken by 54 mandals on the first day in Bhusawal भुसावळ : विघ्नहर्त्या गणरायाच्या विसर्जनानंतर भाविकांना आता दुर्गोत्सवाचे वेध लागले आहेत. दुर्गोत्सव अवघ्या 10 दिवसांवर आल्याने मूर्तीकारांकडून मूर्तीवर अखेरचा हात फिरवला जात आहे तर मंडळाच्या पदाधिकार्यांकडून उत्सवाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. दरम्यान, गणेशोत्सवाप्रमाणे दुर्गोत्सवातही मंडळांना मंडप, ध्वनीक्षेपक, मिरवणूक आदींसाठी पोलिस परवागनी मिळवताना धर्मदाय आयुक्तांची ऑनलाईन एनओसी (ना-हरकत) बंधनकारक आहे. भुसावळ शहरात 175 मंडळातर्फे दुर्गामातेची स्थापना केली जाणार आहे. दरम्यान, शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्यात दुर्गोत्सव मंडळांची गैरसोय टाळण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी पहिल्याच दिवशी 54 मंडळांच्या पदाधिकार्यांनी अर्ज नेल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरात 175 मंडळे करणारे दुर्गेची स्थापना
दुर्गोत्सव मंडळांना पोलिस प्रशासनाकडून आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी पालिका व पोलिस प्रशासनाने (भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे) शहर पोलिस ठाण्यात ‘एक खिडकी’ योजना गुरूवारी सुरू केली. हवालदार प्रमोद पाटील, राजेश बोदडे, बाजारपेठचे संदीप परदेशी, नितीन सपकाळे, हेमंत जांगडे, पालिकेचे कर्मचारी व वीज कंपनीच्या कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भुसावळ शहर हद्दीत 73 व बाजारपेठच्या हद्दीत 102 मंडळांतर्फे माँ दुर्गेची स्थापना होणार आहे. गुरुवारी 54 मंडळांनी अर्ज नेल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात शहर हद्दीत 44 तर बाजारपेठ हद्दीत 10 मंडळांनी अर्ज नेले.

मंडळांकडून तयारीला वेग
दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, भुसावळ तालुक्याचे निरीक्षक बबन जगताप यांची डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी बैठक घेत दुर्गोत्सवाच्या पार्श्वभुमीवर सूचना केल्यात. दरम्यान, मंडळाच्या पदाधिकार्यांनी स्टेज तयार करण्याचे काम सुरू केले आहे तर मूर्ती बुकींगसह अन्य लागणार्या साहित्याची तजवीज कार्यकर्ते करताना दिसून येत आहेत.
कागदपत्रे जमा केल्यावर मिळेल परवानगी
पोलिसांकडे मंडळाच्या पदाधिकार्यांनी कागदपत्रे जमा करावी त्यासोबतच धर्मदाय आयुक्त कार्यालयातील नाहरकत दाखल जोडावा लागणार आहे. तो दाखला जोडल्यावर मंडळाच्या पदाधिकार्यांना परवानगी मिळणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

