चाळीसगाव तालुक्यातील तरुणाचा डंपरखाली आल्याने मृत्यू


A youth from Chalisgaon taluka died after falling under a dumper पाचोरा : पत्नीसोबत चाळीसगाव तालुक्यातील खडकी गावाकडे निघालेल्या तरुणाचा डंपरखाली आल्याने मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. हा अपघात सांगवी, ता.पाचोरा गावानजीक बसस्थानकाजवळ घडला. संदीप राजेंद्र सूर्यवंशी (33, मराठे) असे मयत तरुणाचे नाव आहे.

असा घडला अपघात
संदीप राजेंद्र सूर्यवंशी (33, मराठे) 33 हा तरुण आई व पत्नीसह खडकी, ता. चाळीसगाव येथे वास्तव्यास आहे. संदीप हा शुक्रवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास पत्नी गायत्रीसोबत खडकी, ता.चाळीसगाव येथून दुचाकी (एम.एच.19 डी.क्यू.1859) ने जामनेर येथे आला होता. जामनेर येथील रुग्णालयातील काम आटोपून तो पत्नीसह दुचाकीने पाचोर्‍याकडे येत असतानाच सांगवी गावाजवळील बस स्थानकाजवळ संदीपची दुचाकी गतिरोधकावर आदळली व नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरल्याने पत्नी गायत्री ही विरुध्द बाजुला पडली मात्र संदीप रस्त्यावर पडला व त्याचवेळी कुर्‍हाडच्या दिशेने धरधाव डंपर (एम.एच.46 एफ. 7824) गेल्याने वाहनाच्या मागील चाकाखाली सापडल्याने संदीपचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.



पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धाव
घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी अरविंद मोरे, शैलेंद्र चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर रुग्णवाहिका चालक दादु पाटील यांच्या मदतीने संदीपचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला.

पोलिसांनी डंपर ताब्यात घेतला असून घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल अरविंद मोरे व शैलेंद्र चव्हाण हे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !