दीपनगरात सुरक्षा रक्षकांच्या मारहाणीत पीएपी कर्मचार्‍याचा मृत्यू


भुसावळ : पायात सुरक्षा बुट नसल्याच्या कारणावरून सुरक्षा रक्षकांनी दीपनगरातील पीएपी पदावर कार्यरत असलेल्या संजय बळीराम बर्‍हाटे (46, रा.फेकरी) यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी चौघांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपींवर कारवाईसह वारसास नोकरी व भरपाईसाठी संतप्त नातेवाईकांनी मध्यरात्री तसेच मंगळवारी दुपारी साडेचार तास दीपनगर 210 प्रकल्पाच्या गेटवर मृतदेह आणत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली.

चौघांविरुद्ध गुन्हा : सुरक्षा अधिकार्‍यास अटक
नातेवाईकांच्या आंदोलनानंतर दीपनगर प्रशासनाने मृत संजय बर्‍हाटे यांच्या वारसास प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी म्हणून सामावून घेईपर्यंत निर्वाह भत्ता पूर्ववत मुख्यालयाच्या मंजुरीने देण्यासह वारसास अंतर्गत भत्ता सुरू होईपर्यंत वारसास कंत्राटी पद्धत्तीने नोकरी देण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. दरम्यान, बर्‍हाटे यांच्या मृत्यू प्रकरणी चौघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल असून या प्रकरणी सुरक्षा अधिकारी संजय आनंदा लोकरे यांना रात्री उशिराच अटक करण्यात आली तर अन्य संशयीत पसार झाले आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !