भुसावळ पालिकेची उद्यापासून अतिक्रमण निर्मूलन मोहिम ; यावल रोडसह जामनेर रोडवरील अतिक्रमण हटणार !
Bhusawal Municipality’s encroachment removal campaign from tomorrow; Encroachment on Yaval Road and Jamner Road will be removed ! भुसावळ : शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद होवून वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाल्याने पालिकेने यावल रोड व जामनेर रोड अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. या अनुषंगाने बुधवारी संबंधित अतिक्रमण धारकांना ध्वनीक्षेपकाद्वारे अतिक्रमण हटवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत तर गुरुवार, 11 रोजी सकाळी 10 वाजेपासून अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा प्रशासक जितेंद्र पाटील यांनी दिली.
रस्ते घेणार मोकळा श्वास
शहरात दोन टप्यात अतिक्रमण निघणार असून पहिल्या टप्यात राहुल नगर ते महाराणा प्रताप चौक, शहर पोलिस ठाण्यासमोरील परीसर, न्यायालयामागील परीसर तसेच जळगाव रोडवरील, नाहाटा चौफुली परीसर अतिक्रमणमुक्त केला जाणार आहे.
बाजारपेठेत दिवाळीनंतर होणार कारवाई
पालिकेच्या माध्यमातून गेल्या सोमवारपासून शहरातील अतिक्रमणावर हातोडा पडणार होता मात्र आमदार संजय सावकारे यांनी पुढाकार घेत प्रशासनाशी चर्चा करून दिवाळीपर्यंत कारवाई करू नये, अशा सूचना केल्या होत्या त्यामुळे तूर्त बाजारपेठेतील अतिक्रमण निघणार नाही मात्र रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर हातगाड्या व टपर्या उभ्या करण्यात आल्याने हे अतिक्रमण हटवून रस्ते अतिक्रमणमुक्त केले जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील हातगाड्या, टपर्या काढण्यासाठी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात अधिकार्यांची बैठक होवून त्यात नियोजन करण्यात आले. अतिक्रमण हटवताना पोलिस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे.
दिवाळीनंतर अतिक्रमण हटवण्याची प्रशासकांकडे मागणी
शहरातील अतिक्रमण हटवण्यात आल्यास अनेकांवर बेरोजगाराची कुर्हाड कोसळणार आहे त्यामुळे दिवाळीनंतर अतिक्रमण हटवावे, अशी मागणी शहरातील बेरोजगारांसह शिष्टमंडळाने बुधवारी दुपारी प्रांताधिकार्यांची भेट घेवून केली. यावेळी विजय साळवे, भीमज्योत शेजवळ आदींची उपस्थिती होती.


