पिंप्राळ्यात धाडसी घरफोडी : चौघे चोरटे रामानंद पोलिसांच्या जाळ्यात
Daring burglary in Pimprala : Four thieves in Ramanand police’s net जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळ्यात झालेल्या धाडसी घरफोडीतील चौघा स्थानिक चोरट्यांना रामानंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून घरफोडीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
घरफोडीनंतर काही तासात आरोपी जाळ्यात
शहरातील पिंप्राळा परीसरातील सेंट्रल बँक कॉलनीमध्ये प्रशांत गणेश माहोरे हे वास्तव्यास आहेत. 3 ऑक्टोंबर रोजी त्यांची आजी वारल्याने ते कुटुंबियांसह अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथे गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोकड आणि सोने चांदीच्या दागिने असा एकूण 26 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता. 5 ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास गणेश माहोरे हे घरी येण्यासाठी निघाले असता, त्यांना लहान भावाने फोन करुन घरात चोरी झाल्याचे सांगितले. माहोरे घरी आल्यानंतर त्यांना घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकल्याचे तसेच त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेली रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


चार संशयित आरोपींना केली अटक
चार जणांनी ही घरफोडी केल्याची माहिती मिळताच संशयित सागर राजाराम गवई (23, रा.पिंप्राळा हुडको), अब्रार अमित खाटीक (18, रा.उस्मानिया पार्क), समीर शेख इकबाल (22, दूध फेडरेशन, हुडको) व अमोल प्रकाश शिरसाठ (25, रा.दूध फेडरेशन हुडको) यांना अटक करण्यात आली.
यांच्या पथकाने आवळल्या मुसक्या
ही कारवाई रामानंद नगर पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुशील चौधरी, संजय सपकाळे, राजेश चव्हाण, हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, जुलालसिंग परदेशी आदींच्या पथकाने केली.
