धक्कादायक ! : हतनूर धरणावर आढळला चार हजार ब्रास अवैध वाळू साठा : कार्यकारी अभियंत्यांना नऊ कोटींचा दंड
भुसावळ तहसीलदारांच्या आदेशाने शासकीय वर्तुळात खळबळ : कारवाईकडे लागले लक्ष
Shocking ! : Illegal sand stock of 4000 brass found at Hatnoor Dam : Executive Engineer fined 9 crores भुसावळ : जिल्ह्यात अवैधरीत्या वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाकडून एकीकडे धडक कारवाई केली जात असताना हतनूर धरणावरील आठ दरवाज्यांच्या कामासाठी मात्र चक्क अवैधरीत्या चोरलेली वाळू आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे चार हजार ब्रास अवैध वाळू साठा केल्याप्रकरणी भुसावळ तहसीलदारांनी संबंधित विभागाला नोटीस बजावल्यानंतरही समाधानकारक खुलासा व कागदपत्रे सादर करण्यात न आल्याने जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोनच्या कार्यकारी अभियंत्यांना नऊ कोटी 36 लाख 91 हजार 190 रुपये दंड भरण्याची नोटीस तहसीलदार निता लबडे यांनी मंगळवार, 10 रोजी बजावल्यानंतर शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
असे आहे नेमके प्रकरण
हतनूर धरणावरील नवीन आठ दरवाज्यांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळू साठा करण्यात आल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर वरणगाव मंडळांधिकार्यांनी सुमारे पाच हजार ब्रास वाळू साठ्याचा पंचनामा केला होता. हा अहवाल तहसीलदारांना आल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांना नोटीसीद्वारे साठ्याबाबत विचारणा केल्यानंतर 2112 ब्रास वाळूबाबत 290 छायांकित प्रत (परमीट) सादर करण्यात आल्या तर राज्यातील झिरो रॉयल्टी वाहतूक ईटीपी पास सादर करण्यात आला नव्हता. त्यानंतर सा.बां.विभागाला वाळू साठ्याची मोजणी करण्याचे आदेश दिल्यानंतर हतनूर धरणावर 4093.63 ब्रास वाळू साठा आढळला मात्र गुजरात राज्यातून आणलेल्या वाळूसोबत ईटीपी पास नसल्याने या परवान्याबाबत शंका उपस्थित करण्यात आली व संबंधितांनी नियमांचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्याने दंडात्मक नोटीस बजावण्यात आली.


वाळू तर चोरीचीच !
हतनूर धरणावर साठा करण्यात आलेल्या वाळूबाबत गुजरात राज्याचा खनिकर्म विभागाचा परवाना नव्हता, झिरो रॉयल्टी सादर करण्यात आलेली नाही, कोणत्या वाहनांद्वारे वाळू आणण्याची परवानगी मिळाली त्या वाहनांचे डिटेल्स मिळाले नाहीत त्यामुळे महाखनिज प्रणालीवर पडताळणी करता आली नसल्याने साठा करण्यात आलेला वाळू साठा हा अवैध असल्याचे स्पष्ट असल्याचे तहसीलदार निता लबडे यांनी नोटीसीत म्हटले आहे.
दरवाज्यांचे काम बंद मग साठा कुणासाठी?
4094 ब्रासचा अवैधरीत्या साठा केल्याप्रकरणी बाजारभाव रक्कम व रॉयल्टी मिळून नऊ कोटी 36 लाख 91 हजार 190 रुपये दंडाची नोटीस कार्यकारी अभियंता जळगाव मध्यम प्रकल्प दोन यांना तहसीलदार लबडे यांनी मंगळवारी बजावल्याने शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शासकीय कामांसाठी अवैधरीत्या चोरीची वाळू वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता नेमकी काय कारवाई होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून धरणावरील दरवाज्यांचे काम बंद असताना हा साठा नेमका कुणासाठी केला जात होता? याचा शोध लावण्याची अपेक्षा आहे.
