पीएपी कर्मचार्याचा मृत्यू : दोघांना अटक, तिसर्या आरोपीला कोठडी
भुसावळ : पुतणीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी हलवाईसह अन्य मजुरांना चहा आणण्यासाठी कॅन्टीनकडे जाणार्या संजय बळीराम बर्हाटे (46) यांच्या पायात सुरक्षा बुट नसल्याचे कारण सांगत 210 प्रकल्पाच्या गेटवरील सुरक्षा रक्षकांनी त्यांना बेदम मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 12 वाजेनंतर घडली होती. या प्रकरणी दोषींवर कारवाईसाठी मध्यरात्री व मंगळवारी दुपारी मृतदेहासह नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले होते. या प्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर सुरक्षा अधिकारी संजय आनंदा लोकरे यांना अटक करण्यात आली होती. बुधवारी त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत अर्थात सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
अन्य दोघा सुरक्षा रक्षकांनाही अटक
बर्हाटे यांच्या मृत्यूप्रकरणी बुधवारी सागर संदीप मोरे (22, फेकरी) व राजेश ज्ञानबा बनसोड (25, फेकरी) यांना अटक करण्यात आली. सायंकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तर गुरुवारी त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्यात अन्य एक आरोपी पसार असून त्याचादेखील कसून शोध सुरू आहे. पोलिसांकडून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले जात आहेत. तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार स्वतः करीत आहेत.



