दुचाकी चोरी प्रकरण : यावल तालुक्यातील 17 संशयितांकडून चोरीच्या 29 दुचाकी जप्त
चुंचाळेतील दुचाकी चोरीप्रकरणी चौघांना अटक तर अन्य संशयित कोठडीत
Two-wheeler theft case : 29 stolen two-wheelers seized from 17 suspects in Yaval taluka यावल : यावल पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केलेल्या 17 चोरट्यांच्या टोळीकडून आतापर्यंत 29 चोरीच्या दुचाकी व चोरी केलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आहे. चुंचाळेतील दुचाकी चोरीप्रकरणी चौघांना पुन्हा अटक करण्यात आली तर अन्य संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
नव्याने 13 दुचाकी हस्तगत
यावल पोलिसांनी दुचाकी चोरी करणार्या टोळीकडून नव्याने 13 दुचाकी जप्त केल्या आहेत. अटकेतील 17 संशयीतांनी पोलिसांकडे 37 दुचाकी चोरीची कबुली दिली व टप्प्या-टप्प्याने आजवर पोलिसांनी 29 दुचाकी विविध भागातून जप्त केल्या आहेत. अटकेतील सर्व 17 संशयीतांची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा यावल न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एस.बी.वाळके यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता सर्वांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर आरोपी अर्जुन कुंभार, अशरफ तडवी, जावेद खान व सागर उर्फ उमेश सपकाळे या चौघांना पोलिसांनी चुंचाळे येथून चोरी झालेल्या दुचाकीच्या प्रकरणात पुन्हा अटक केली आहे. पुढील तपास डीवाएसपी डॉ.कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, सहायक फौजदार विजय पाचपोळे, राजेंद्र पवार करीत आहे.


चेसीस क्रमांकाद्वारे दुचाकीच्या मूळ मालकाचा शोध
चोरट्यांकडून जप्त झालेल्या सर्व दुचाकींच्या मूळ मालकाचा शोधसाठी जळगाव जळगाव आरटीओ यांची मदत घेण्यात येत आहे. वाहनाच्या चेचीस क्रमांकावरून मूळ मालक शोधणे, संबधीत मालकांने कोणत्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला याची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे.
