जी.एस.टी.चुकवत शासनाला चुना : सेल टॅक्स विभागाने तीन ट्रक पकडल्या
रावेर : महाराष्ट्रातून सिमेंट भरून मध्यप्रदेशाकडे जाणार्या तीन ट्रकांना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरवड सीमेवर जीएसटी टॅक्स विभागाने पकडत कारवाई केल्याने कर चुकवणार्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यांपासून सर्रासपणे हा प्रकार सुरू असल्याची ओरड होती मात्र आता थेट कारवाई झाल्याने त्यास पुष्टी मिळाली आहे.
जीएसटी न भरता शासनाला लाखोंचा चुना
आंतरराज्य वाहतुकीचा टॅक्स न भरता रात्रीच्या अंधारात शासनाची दिशाभूल करून जळगाव येथून सिमेंट घेऊन मध्यप्रदेशच्या दिशेने निघालेल्या तीन ट्रक पथकाने ताब्यात घेतल्या. बुधवारी मध्यरात्री चोरवडनजीक सापळा रचुन ही कारवाई करण्यात आली. त्यात आयशर क्रमांक (एम.पी.68 जी.0476) मध्ये लोखंडी पाईप तर ट्रक (आर.जी. 05 जी.3115) व (एम.एच. 12 एल.टी. 3169) मध्ये सिमेंटची वाहतूक होत असताना त्या पथकाने ताब्यात घेत रावेर पोलिसात जमा केल्या. ही कारवाई जीएसटी टॅक्स विभागाचे गोयल यांच्या पथकाने केली. सरकारचा टॅक्स चुकवणारा यातील सूत्रधार अद्याप समोर आलेला नाही मात्र पथकाकडून संबंधिताच्या चौकशीअंती अनेक बाबी समोर येणार आहेत.
अशी होती टॅक्स चोरी
मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यात सिमेंटचे वेग-वेगळे भाव आहेत. जळगाव येथील सिमेंटने ट्रक भरल्यानंतर चाळीसगाव आरओ काढला जातो व तो ट्रक चाळीसगावकडे न जाता आंतरराज्य टॅक्सची पावती न घेता परस्पर मध्यप्रदेशात पाठविला जातो. या प्रकाराला शासनाला लाखो रूपयांचा चुना लावला होता. गेल्या एक वर्षांपासून सुरू असल्याचे सांगण्यात आले.

