यावलला अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन महसूलच्या पथकाने पकडले
यावल : शहरात अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे एक वाहन महसूलच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हे वाहन यापूर्वी यावल पोलिसांनी पकडले होते. त्यात अवैध वाळू असल्याने महसूल पथकाने हे वाहन ताब्यात घेऊन मालकाला दंडाची नोटीस बजावली आहे.
वाहन मालकाला दंडात्मक नोटीस
यावल शहरातून जितेंद्र शालिक सपकाळे (कानळदा) यांच्या मालकीचे वाहन (क्रमांक एम.एच. 04 जी.सी. 2423) द्वारे वाळुची चोरटी वाहतूक केली जात होती. हे वाहन पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडल्यानंतर वाळू वाहतुकीच्या परवान्याची माहिती महसूल विभागाकडून घेण्यात आली असता संबंधीत वाहन मालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे उघड झाल्यने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या आदेशाने तलाठी ईश्वर कोळी, तलाठी एस.व्ही.सूर्यवंशी यांनी हे वाहन पोलिस ठाण्याच्या बाहेरून ताब्यात घेतले आहे. संबंधित मालकाला दंडाच्या संदर्भात नोटीस देखील बजावण्यात आली. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.


