अंजाळे घाटात बस-ट्रकचा अपघात : पाच जण जखमी
वाहतूक ठप्प : एक प्रवासी गंभीर : सुदैवाने अन्य प्रवासी बचावले
यावल : अंजाळे घाटात बसने समोरून येत असलेल्या ट्रकला दिलेल्या धडकेनंतर झालेल्या अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले तर सुदैवाने अन्य प्रवासी सुखरूप बचावले. गुरूवारी सकाळी 9.20 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातात एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. भुसावळ आगाराची भुसावळ-हिंगोणा बस (एम.एच.14 बी.टी.0442) ही हिंगोण्याकडे निघाली असतानाच अंजाळे घाट उतरत असताना समोरून येणारा ट्रक (जी.जे.एक्स.5862) ला बसने धडक दिल्याने बसचा वाहक साईडचा पुढील भागातील पत्रा मोठ्या प्रमाणात फाटला तर या अपघातात चार प्रवासी जखमी झाले. घाटावरच झालेल्या अपघातामुळे दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. अपघातानंतर जखमींसह प्रवाशांना अन्य बसने हलवण्यात आले. अपघातानंतर यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व सहकार्यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच क्रेनद्वारे अपघातग्रस्त वाहने हलवली. यावल पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.


