मानधन रखडले : भुसावळात होमगार्डचा मूक मोर्चा


महिला-पुरूषांचा मूक मोर्चात सहभाग : प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन : मानधनाअभावी कुटुंबावर संकट

भुसावळ : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र बंदोबस्ताची भूमिका वठवणार्‍या होमगार्ड बांधवांना तब्बल सहा महिन्यांपासून त्यांच्या हक्काचे मानधन न मिळाल्याने न्याय मागणीसाठी त्यांनी गुरुवारी शहरातील जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिरापासून मूक मोर्चा काढत प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन दिले. होमगार्ड बांधवांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी प्रथमच रस्त्यावर उतरत साध्या कपड्यांमध्ये मोर्चा काढण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.

अष्टभूजा देवी मंदिरापासून मूक मोर्चा
शहरातील पोळा, गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दिवाळी, निवडणुका आदींमध्ये प्रामुख्याने पोलिसांसोबत बंदोबस्ताची अचूक भूमिका वठवणार्‍या होमगार्ड बांधवांना त्यांच्याच हक्काच्या मानधनासाठी मोर्चा काढावा लागल्याने नागरीकांनीही आश्‍चर्य व्यक्त केले. होमगार्ड कर्मचार्‍यांनी शासनाच्या दुटप्पी धोरणाविषयी संताप व्यक्त केला. होमगार्ड संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्याने गुरुवारी अष्टभुजा देवीच्या मंदीरापासून मोर्चाला सकाळी 10.45 वाजता मूक मोर्चाला सुरूवात करण्यात आली.




शिष्टमंडळाने दिले निवेदन
जामनेर रोडने हा मोर्चा वाल्मीक नगर, पांडुरंग टॉकीज, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरील लोखंडी पूलाखालून मोर्चा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दित येत हंबर्डीकर चौक, पालिका दवाखाना, शहर पोलिस ठाणे, गांधी पुतळा, नवीन तहसील कार्यालय, टेक्निकल हायस्कूल वरून पुढे जात प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. प्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोर्चेकरी होमगार्ड यांना पोलिसांनी थांबविले. यावेळी होमगार्ड यांच्या शिष्ट मंडळाला प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आत सोडण्यात आले. प्रांत नसल्याने होमगार्ड यांच्याकडून निवेदन दिलीप बारी यांनी स्विकारले तर अन्य होमगार्ड यावेळी बाहेर थांबून होते.

या मागण्यांसाठी निघाला मूक मोर्चा
राज्यातील 50 ते 55 वयोगटातील पुरूष व महिला होमगार्ड यांना विविध कारणाने अपात्र केल्यांना त्यांना बिनशर्त परत कामावर घ्यावे, महाराष्ट्र होमगार्डच्या मागील सहा महिन्यांचे थकीत बिल (पगार) तात्काळ मिळण्यात यावे, पोळा ते विधानसभा निवडणुकीचे मानधन अद्यापही मिळाले नाही, ते मिळावे तसेच 10 जानेवारी 2020 ला महाराष्ट्र सरकारने परीपत्रक काढून महाराष्ट्र होमगार्ड संघटनेतील 30 ते तीन हजार होमगार्ड यांना देण्यासाठी शासनाकडे निधी नसल्याने दखल घ्यावी, शनिवारची साप्ताहिक कवायत करण्यात आली असून ती रद्द करून पूर्वी प्रमाणेच महिन्यातील चार रविवारी सकाळच्या वेळीच ठेवण्यात यावी, अन्य राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातील होमगार्ड यांना सुध्दा 365 दिवस ड्युटी दिली जावी आदी मागण्या करण्यात आल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !