जखमी विद्यार्थ्यासाठी ‘देवदूत’ ठरलेल्या लोकोपायलटसह गार्डचा सत्कार
डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी बक्षीस व प्रमाणपत्र देवून केले कौतुक
भुसावळ : देवळाली-भुसावळ पॅसेंजरमधून पडल्याने राहुल संजय पाटील (22, पाचोरा) हा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना माहिजीजवळील रेल्वे खांब क्रमांक 383 जवळ गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती. जखमी विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी तब्बल दोन किलोमीटर गाडी मागे नेण्यात आल्यानंतर जखमी पाटील यांना म्हसावद रेल्वे स्थानकावर आणल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारार्थ खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. या घटनेत जखमी प्रवाशासाठी देवदूतासमान ठरलेल्या देवळाली शटलमधील लोकोपायलट, सहाय्यक लोकोपायलट तसेच गार्ड यांचा शुक्रवारी डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी एक हजारांची रोकड, प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करीत त्यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुकही केले.
गर्दीतून पडल्याने जखमी झाला होता विद्यार्थी
जळगावच्या आयएमआर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेला राहुल पाटील हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी देवळाली शटलने जळगावकडे निघाल्यानंतर माहिजी रेल्वे स्थानकाजवळ गर्दीमुळे रेल्वेतून पडला होता. या घटनेनंतर गाडीतील प्रवाशांनी धोक्याची साखळी ओढून गाडी थांबवली होती. या घटनेबाबत ट्रेन लाईव्ह संघटनेच्या सदस्यांनी संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांना घटनेची माहिती कळवल्यानंतर त्यांनी पाचोरा स्टेशन प्रबंधक एस.टी.जाधव यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली हेाती. जाधव यांनी परधाडे व माहिजी स्टेशन प्रबंधकांसह गाडीतील लोकोपायलट यांच्याशी संपर्क साधला व रेल्वेच्या वरीष्ठ अधिकार्यांची परवानगी मिळाल्यानंतर तब्बल दोन किलोमीटर जखमी प्रवाशासाठी देवळाली पॅसेंजर मागे घेण्यात आली होती. जखमी प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी चालकासह गार्डने दाखवलेल्या माणुसकीचे रेल्वेच्या प्रवाशांसह सर्वसामान्य नागरीकांनी तोंडभरून कौतुक केले होते.
‘देवदूता’समान कर्मचार्यांचा सत्कार
जखमी विद्यार्थ्यासाठी देवदूतासमान ठरलेल्या देवाळी शटलमधील गार्ड आर.बी.पारधे, लोको पायलट ए.के.पांडे व सहायक लोको पायलट नीरज पांडे यांचा शुक्रवारी डीआरएम कार्यालयात डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी प्रशस्तीपत्र तसेच एक हजारांची रक्कम देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वरीष्ठ मंडल विद्युत अभियंता पी.के.भंजा, वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, सहाय्यक परीचालन प्रबंधक रामेकर आदी उपस्थित होते.

