वरणगाव पाणीपुरवठा योजनेवरची स्थगिती उठवा
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री व प्रधान सचिवांकडे वरणगाव नगराध्यक्षांची मागणी
भुसावळ- तालुक्यातील वरणगाव शहरासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेवरची राज्या सरकारने बसविलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव विकास खरगे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा प्रधान सचिव मनीषा म्हैस्कर, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, अर्थमंत्री जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्याकडे वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह उपनगराध्यक्ष शेख अखलाक ,मुख्याधिकारी शामकुमार गोसावी यांनी भेट केली.
हा वरणगावकरांवर अन्यायच
50 हजार लोकसंख्येच्या वरणगाव शहरात चार ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांचे पाण्यासाठी हाल होतात. नागरीकांना 24 तास पाणी मिळण्यासाठी 25 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना खास बाब म्हणून माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात 13 सप्टेंबर रोजी मंजूर करून घेतली होती. या योजनेचे टेंडर सुद्धा निघाले मात्र सरकारने पाणी योजनेवर स्थगिती बसवल्यामुळे वरणगाववासीयांवर हा एक प्रकारे अन्यायच झाला आहे.
वरणगावात विकासाचा वेग मंदावला
वरणगाव नगरपरीषदेच्या नवनिर्मित योजनेसाठीच्या कोट्यवधींच्या निधीला स्थगिती देण्यात आल्याने वरणगाव शहरात नगरपरीषदेच्या माध्यमातून सुरू असलेली विकासाच्या कामांची गती मंदावली आहे. उर्वरीत निधीवर सुद्धा जी स्थगिती सरकारने बसवली आहे ती सुडाचे राजकारण न करता उठवण्याची मागणी प्रसंगी करण्यात आली.


