भुसावळ-नरखेड मेमुचे खासदारांच्या हस्ते 9 रोजी उद्घाटन
भुसावळ : भुसावळ-नरखेड मेमु गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून रविवार, 9 पहाटे साडेसहा वाजता खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या गाडीचे उद्घाटन केले जाणार आहे. खासदार रक्षा खडसे गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचार व अर्थसंकल्पीय अधिवेशन कामी दिल्ली येथे व्यस्त असल्याकारणाने प्रवाश्यांच्या सोयीसाठी प्रत्यक्षात भुसावळ-नरखेड मेमु ट्रेन 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याची सूचना खासदारांनी रेल्वे प्रशासनाला दिल्या होत्या. या कारणामुळे कोणताही औपचारिक कार्यक्रम न घेता रेल्वे प्रशासनाने 1 फेब्रुवारीपासून भुसावळ-नरखेड मेमु ट्रेन सुरू केली होती. त्यामुळे रविवारी पहाटे साडेसहा वाजता भुसावळ-नरखेड मेमु रेल्वे चे औपचारीक उद्घाटन खासदार खडसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, पंचायत समिती सभापती मनीषा पाटील, उपसभापती, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

