ऑनलाईन लाखोंचा गंडा : दिल्लीसह राजस्थानमधील संशयीत जाळ्यात
एटीएम बंद पडल्याचे कारण झाली होती फसवणूक तसेच ओएलक्सवरून वाहन विक्री झाली होती फसवणूक
जळगाव : एटीएमकार्ड बंद पडल्याची बतावणी करून ते सुरू करण्यासाठी एटीएम कार्डची माहिती विचारतएक लाख 19 हजार 357 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणार्या तिघा भामट्यांना दिल्लीतून अटक करण्यात जळगाव सायबर विभागाला यश आले आहे तर दुसर्या एका गुन्ह्यात जळगावच्या तक्रारदाराला ओएलक्स या वेबसाईटवरून आय- 20 विक्रीत एक लाख 46 हजार 700 रुपयात गंडवणार्या राजस्थानमधील आरोपीच्या मुसक्या आवळण्यातही या शाखेला यश आले आहे. दरम्यान, आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ऑनलाईन लाखोंचा गंडा
23 जुलै 2019 ते 26 जुलै 2019 दरम्यान तक्रारदार यांना अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर संपर्क करून एसबीआय क्रेडीटकार्ड डिपार्टमेंट येथून बोलत असल्याचे बतावणी करून तक्रारदार यांच्याकडून एटीएम कार्डवरील 16 आकडी नंबर विचारून घेत मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक विचारून त्यांच्या खात्यातून 89 हजार 488 रूपये एमआय डॉटकॉम खात्यात वळविले तर अॅक्सीस बँक क्रेडीट कार्डचा सोळा आकडी नंबर आणि ओटीपी नंबर विचारून त्यातून 29 हजार 869 वेगवेगळ्या वॉलेटमध्ये वळवत एक लाख 19 हजार 357 रूपयांची फसवणूक केली होती. पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी 03 फेब्रुवारी 2020 रोजी सफौ मनोहर देशमुख, पोहेकॉ वसंत बेलदार, पोकॉ नितीन भालेराव, पोकॉ दिपक सोनवणे, पोकॉ ललीत नारखेडे यांना नवी दिल्ली येथे पथक रवाना केल्यानंतर दोन दिवसानंतर फैज आलम रमातुल्ल (28, रा. हाऊस नं.18, मोहन गार्डन उत्तम नगर, नवी दिल्ली), अदित्य ब्रिजभुषण गर्ग (21, रा.प्रताम गार्डन, उत्तम नगर, नवी दिल्ली), शेषनाथ जयप्रकाश गुप्ता (40, रा. डिफेन्स एन्क्लेव मोहन गार्डन, नवी दिल्ली) या तिघांना अटक केली.
राजस्थानमधून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या
ओएलक्सवरून वाहन विक्रीत झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात लवदीप लखमीचंद (29, खुर्द भांडोर, जि.भरतपूर, राजस्थान) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून चार महागडे मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपीला 10 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई उपनिरीक्षक अंगत नेमाणे, दिलीप चिंचोले, श्रीकांत चव्हाण, गौरव पाटील, पंकज पाटील आदींच्या पथकाने निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

