जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांवर अन्याय : भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस आता अमरावतीहून धावणार !
प्रवाशांमधून तीव्र संताप ; भुसावळातील गाडीची वेळ गैरसोयीची
Injustice to passengers in Jalgaon district : Bhusawal-Pune express will now run from Amravati भुसावळ : चाकरमान्यांसह प्रवाशांना अत्यंत सोयीची असलेली 11025 व 11026 पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस आता अमरावती येथून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आल्याने रेल्वे प्रवासी संतप्त झाले आहेत. रेल्वे प्रशासनाच्या परीपत्रकानुसार सोमवार, 13 नोव्हेंबरपासून भुसावळ-पुणे एक्स्प्रेस आता अमरावती-पुणे एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे. एरव्ही पुण्यासाठी स्वतंत्र गाडी सोडण्याची मागणी पूर्ण होत नसताना आहे ती गाडी अमरावतीपर्यंत वाढवण्यात आल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. लोकप्रतिनिधींनी अमरावतीपर्यंत विस्तार थांबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा फोल ठरला आहे.
हुतात्मा आता अमरावतीहून सुटणार
डाऊन 11026 पुणे-अमरावती एक्स्प्रेस सोमवार, 13 नोव्हेंबरपासून पुणे येथून सकाळी 11.05 वाजता सुटेल व अमरावती येथे दुसर्या दिवशी रात्री 12.55 वाजता पोहोचणार आहे तर अप गाडी क्रमांक 11025 अमरावती-पुणे एक्स्प्रेस सोमवार, 13 अमरावती येथून रात्री 10.50 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसर्या दिवशी सकाळी 11.25 वाजता पोहोचेल. या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, बडनेरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 17 डब्बे असतील. एक वातानुकूलित चेअर कार, एक शयनयान, 13 साधारण (नॉन एसी) चेअर कार ज्यापैकी सात आरक्षित आणि सहा अनारक्षित, दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार असेल.






मध्यरात्रीची वेळ गैरसोयीची
पूर्वी हुतात्मा एक्स्प्रेस भुसावळ येथून नाशिकमार्गे पुण्यात धावत होती त्यामुळे भुसावळसह यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, चोपडा आदी भागातून पुणे येथे जाणार्या प्रवाशांची सोयदेखील होत होती. पुण्यासाठी स्वतंत्र गाडी असावी या मागणीनंतर मनमाड येथून विस्तार करीत ही भुसावळ स्थानकावरुन सुरू करण्यात आली होती मात्र या गाडीचा आता अमरावतीपर्यंत विस्तार करण्यात आला असून ती नाशिकऐवजी मनमाडमार्गे पुढे धावणार असून नाशिक जाणार्यांची गैरसोय होणार आहे.
भुसावळ येथे रात्री 2.35 वाजता ही गाडी येणार असून ही वेळ प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीची ठरणार आहे. भुसावळातून पुण्यासाठी स्वतंत्र एक्स्प्रेसची मागणी असताना व हुतात्मा एक्स्प्रेस एक चांगला पर्याय होती मात्र आता तीदेखील अमरावतीपासून सुरू झाल्याने भुसावळकरांना या गाडीचा फारसा फायदा होणार नाही.
एक्स्प्रेसला बोदवडसह मलकापूर व नांदुरा येथे थांबा
हुतात्मा एक्स्प्रेस आला आता बोदवड, मलकापूर व नांदुरा येथे थांबा देण्यात आला असून या माध्यमातून या भागातील प्रवाशांची सोय झाली आहे. खासदार रक्षा खडसे यांनी या संदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. सोमवारी 9.35 वाजता खासदार या गाडीला हिरवी झेंडी दाखवतील.


