नितीमूल्याच्या शिक्षणानेच भावी पिढीची जडण-घडण


प.पू. मुनीश्री अक्षयसागरजी महाराज : जैन मुनींच्या पदस्पर्शाने पावन झाली साकळीची भूमी

यावल : आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळण्यासाठी नीतिमूल्यांनी शिक्षण मिळाले पाहिजे व यातूनच देशाची भावी पिढी घडत असते. परीवाराचा सुसंस्काराचा स्तंभ धर्मावर स्थिरावलेला असतो. संस्कारहीन शिक्षण आमच्या परीवार, धर्म व देश यासाठी घातक असल्याचे विचार प.पू. मुनीश्री अक्षयसागरजी महाराज यांनी साकळी येथे व्यक्त केले. तालुक्यातील साकळी येथील प.पू.आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांचे परमशिष्य प.पू.मुनिश्री 108 अक्षय सागरजी महाराज, प.पू.मुनीश्री नेमीसागरजी महाराज व शुल्लकरत्न 105 समताभूषणजी महाराज यांचे दहिगाव येथून नुकतेच साकळी येथे आगमन झाले. याप्रसंगी भाविकांना सुश्राव्य प्रवचनात अक्षयसागरजी यांनी मार्गदर्शन केले.

स्वागत मिरवणुकीने वेधले लक्ष
जैन मुनींच्या आगमनानंतर गावातील महात्मा फुले चौकापासून ते जैन मंदिरापर्यंत वाजत-गाजत भव्य अशी स्वागत मिरणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शालेय विद्यार्थ्यांचे लेझीम पथक सहभागी झाले. साकळी गावासह दहिगाव व परीसरातील जैन समाजातील महिला-भगिनी व बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

सुखाचा आधार ‘धन’ नाही तर ‘धर्म’
अक्षयसागरजी म्हणाले की, जीवनाचा आधार ‘धर्म ’असला पाहिजे. जगण्याची कला ही धर्माशिवाय साकारता येत नाही. सुखाचा आधार ‘धन’ नाही तर ’धर्म’ आहे. जगभरात सर्वोच्चस्थानी असलेली भारतीय संस्कृती धर्माच्या आधारावर बनलेली आहे व त्यामुळे ती जगात वंदनीय बनलेली आहे. ही बाब धार्मिकदृष्टया आणि सुदृढ़ समाज निर्मितीसाठी गौरवशाली आहे व समाजप्रबोधन व्हायला पाहिजे, असेही मुनिश्री अक्षयसागरजी महाराज म्हणाले. या दरम्यान जिल्हा परीषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी शनिवारी भेट घेऊन आशिर्वाद घेतले.

जि.प.शाळा डिजिटल करण्याची सूचना
प.पू. मुनिश्री अक्षयजी महाराज यांनी रवींद्र पाटील यांना सांगितले की, आपल्या पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील संपूर्ण जिल्हा परिषद शाळा डिजिटल व आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी आपल्या वैयक्तिक पातळीवरून सुद्धा प्रयत्न करा. शिक्षणाबाबतीत आपला परीरसर आदर्श बनवा. जेव्हा जिल्हा परीरषद शाळांकडे विद्यार्थी वळतील तेव्हा देशासाठी आदर्श पिढी घडेल तसेच जिल्हा परीषद शाळेमुळे शिक्षण घेतल्यामुळे मातृभाषेची आवड निर्माण होते. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दीपक पाटील, निलेश जैन, रोहन जैन, सौरभ जैन, आदित्य जैन, स्वप्नील जैन, प्रवीण जैन, बापू साळुंखे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !