पोलिस अधिकार्‍यालाच लाचेची ऑफर : लाच देणारा पोलिस कोठडीत


कडेगाव : एरव्ही शासकीस काम करून देण्यासाठी लाच स्वीकारण्यात आल्याच्या घटना नेहमीच चर्चेत असतात मात्र चक्क पोलिस अधिकार्‍यालाच पाच हजार रुपयांची लाच ऑफर देण्यात आल्यानंतर एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच देणार्‍याविरोधात कारवाई करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली. अभिजित नारायण गोरड (36, रा. उपाळे-मायणी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी कडेगाव पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका अधिकार्‍याने तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

लाच देणे भोवले
तक्रारदार हे कडेगाव पोलिस ठाण्यात अधिकारी आहेत. उपाळे मायणी येथील अभिजित गोरड यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात त्यांच्या भावाविरुद्ध दिलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकार्‍यास लाच घेण्याबाबत आग्रह केला. यावर संबंधित पोलिस अधिकार्‍याने 8 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली असता अभिजित गोरड याने तक्रारदार अधिकार्‍यास 5000 रुपये लाच घेण्याचा आग्रह केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मंगळवारी कडेगाव पोलिस ठाण्यात सापळा लावण्यात आला. यावेळी अभिजित गोरड याला तक्रारदार अधिकार्‍यास 5000 रुपये लाच देत असताना रंगेहात पकडण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !