दीपनगरात 42 दिवसानंतर वीजनिर्मिती : दोन्ही संच अखेर लाईटअप


भुसावळ : तब्बल 42 दिवसांपासून बंद असलेल्या दीपनगरातील 500 मेगावॅटच्या दोन्ही संचातून बुधवारपासून वीज निर्मितीला सुरुवात झाली आहे. एमओडीमुळे संच बंद झाले असलेतरी मंगळवारी लोड डिस्पॅच सेंटरच्या आदेशानुसार हे संच लाईटअप झाल्यानंतर त्यातुन बुधवारी मागणीनुसार वीजनिर्मिती केली जाणार आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यांपासून साऊथ इस्ट कोलफिल्डमधून कोळसा मिळत असल्याने वाहतूकीसाठी खर्च वाढल्याने प्रतीयुनिट वीज निर्मितीचे दरही वाढल्याने वीज निर्मिती ठप्प झाली होती.

अखेर 42 दिवसानंतर वीज निर्मिती
वीज महाग असल्याने एमओडी तत्वानुसार संच क्रमांक चार आणि पाच बंद करण्यात आल्यानंतर तब्बल 42 दिवसांपासून वीज निर्मिती ठप्प (संच शटडाऊन) पडली होती मात्र आता मंगळवारी लोड डिस्पॅच सेंटरच्या आदेशानुसार दीपनगरातील प्रत्येकी 500 मेगावॅट क्षमतेचे संच क्रमांक चार आणि पाच हे बुधवारपासून कार्यान्वीत करण्यात आले आहेत. दरम्यान, दीपनगर केंद्रातील 210 मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक तीन वर्षभरापासून बंदच असतानाच दोन्ही संच शट डाऊन असल्याने प्रकल्पातून वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली होती. बुधवारपासून 500 मेगावॅटच्या दोन्ही संचांतून राज्याच्या मागणीनुसार विजेची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !