भुसावळातील सत्ताधार्‍यांचा गटारीत भोपळा सोडून निषेध


राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचे शहरात अनोखे आंदोलन

भुसावळ : शहरभर साचलेला कचरा व त्याकडे पालिका प्रशासनासह सत्ताधार्‍यांची होणारी डोळेझाक पाहून शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी जामनेर रोडवरील ड्रेनेजमध्ये भोपळा सोडून सत्ताधार्‍यांचा अनोख्या पद्धत्तीने निषेध नोंदवला. स्व.मोटूमल चांदवाणी चौकातून आठवडे बाजाराला जोडणार्‍या मार्गावर गेल्या तीन वर्षांपासून ड्रेनेजचा खड्डा पडल्याने याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने मंगळवारी या ड्रेनेजमध्ये भोपळ्याचे विसर्जन करून सत्ताधारी भाजपचा निषेध व्यक्त करण्यात आला.

शहरभर अस्वच्छता : नावालाच होते सफाई
शहरातील जामनेररोडवरील स्व.मोटूमल चांदवाणी चौकातून पूर्वेकडे बाजाराला जोडणार्‍या मार्गावर उजव्या बाजूने गेल्या तीन वर्षांपासून ड्रेनेजचा मोठा खड्डा पडला असून गेल्या तीन वर्षांपासून निर्माण झालेली ही समस्या पालिकेच्या सत्ताधार्‍यांना अनेकवेळा मागणी करूनही सोडवता आली नाही. या ड्रेनेजमध्ये सांडपाणी तुंबून अस्वच्छता निर्माण होत आहे. या प्रकारामुळे अस्वच्छता वाढत असतानाही मुग गिळून गप्प असलेल्या पालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीने मंगळवारी या ड्रेनेजमध्ये भोपळा विसर्जीत करून निषेध व्यक्त केला.



यांची होती उपस्थिती
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित गटनेते तथा नगरसेवक दुर्गेश ठाकूर, उल्हास पगारे, आशिक खान शेरखान, नगरसेवक राहुल बोरसे, राहुल वाघ, विकी चौधरी, हर्षल पाटील, संगीत खरे, सोनू चाबुकस्वार, जगदीश वाघ तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

आतातरी सत्ताधार्‍यांची झोप उघडणार का?
शहरात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून गटारी तुंबल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेने नागरीक त्रस्त झाले असून वाहनधारकांना पाठिचे आजार जडले आहेत, अमृत योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याने आतातरी सत्ताधार्‍यांची झोप उघडणार का? असा प्रश्‍न राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलनप्रसंगी उपस्थित केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !