भुसावळात मुख्यमंत्री फडणवीस यांचे जंगी होणार स्वागत
22 रोजी महाजनादेश यात्रा येणार ; शहर भाजपामय करण्याचा निर्धार
भुसावळ : माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराने झालेले निधन व राज्याला बसलेला अतिवृष्टीचा तडाखा यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती तर राज्यात पूरस्थिती असतानाही यात्रा सुरूच ठेवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांवर विरोधी पक्षांनी चौफेर टीका करत हल्लाबोल केला होता मात्र विरोधकांच्या दबावाला बळी न पडता भाजपने ही यात्रा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळ येथे 22 ऑगस्ट रोजी महाजनादेश यात्रा येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता डी.एस.ग्राऊंडवर जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी भाजपा पदाधिकार्यांनी नियोजन बैठक घेतली. यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यासह शहर भाजपामय करण्याचा निर्धार करण्यात आला.
22 रोजी धुळ्याहून महाजनादेश यात्रेला सुरुवात
भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांना महाजनादेश यात्रेचा दौरा प्राप्त झाला असून 22 ऑगस्ट रोजी धुळे येथून सकाळी महाजनादेश यात्रेला प्रारंभ होणार आहे. अमळनेर येथे सकाळी 11.30 वाजता तर धरणगाव येथे 12.30 वाजता महाजनादेश यात्रा पोहोचल्याने तिचे स्वागत करण्यात येईल तर दुपारी 1.30 वाजता जळगाव येथील सागर पार्कवर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता जामनेर येथे व सायंकाळी पाच वाजता भुसावळात जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर महाजनादेश यात्रेचा भुसावळातच मुक्काम राहणार असून दुसर्या दिवशी 23 रोजी सकाळी मुख्यमंत्री प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधणार असून त्यानंतर खडका, किन्ही, बोदवडमार्गे मलकापूरकडे महाजनादेश यात्रा प्रयाण करणार असल्याची माहिती भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शहर सजणार
महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भुसावळात येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी स्थानिक भाजपा पदाधिकार्यांनी रविवारी नियोजन बैठक घेतली. यावेळी शहरातील रस्त्यांची डागडूजी, स्वागताचे फलक व बॅनर्स लावून शहर भाजपामय करण्याचा निर्धार करण्यात आला. महाजनादेश यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाऊड स्पीकरवर जनजागृती करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार संजय सावकारे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश पाटील, भाजपा शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, गटनेता मुन्ना तेली, युवराज लोणारी, प्रमोद नेमाडे, परीक्षीत बर्हाटे, अनिकेत पाटील, रमेश मकासरे, सर्व नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.