भुसावळात महिलेचे धूमस्टाईल मंगळसूत्र लांबवले
भुसावळ : शहरात धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवण्याच्या घटना ताज्या असतानाच बुधवारी सायंकाळी तहसील कार्यालयासमोरच दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील चार तोळ्याचे मंगळसूत्र लांबवल्याने महिलावर्गात प्रचंड घबराट पसरली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांसह नागरीकांनी चोरट्यांचा पाठलाग केला मात्र ते पसार होण्यात यशस्वी झाले. हेल्मेटधारी चोरट्यांचा सीसीटीव्हीच्या आधारावरून पोलिसांकडून शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
महिनाभरात तिसरी घटना
निंभोरा (ता. रावेर) येथील रहिवासी असलेले प्रभाकर कोळंबे आणि त्यांचे नातेवाईक हे जळगाव येथून लग्नाहून परतल्यानंतर निंभोरा जाण्यासाठी भुसावळात उतरले. जळगाव रोडवरील तहसील कार्यालयासमोरील पेट्रोल पंपाच्या बाजूला उभ्या असलेल्या स्ट्रॉबेरीच्या गाडीवर स्ट्रॉबेरी घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गाडीतून तीन महिला उतरल्या व त्यांनी स्ट्रॉबेरी खरेदी केल्यानंतर त्या पुन्हा गाडीकडे जात असतानाच समोरून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून दोघो चोरट्यांनी सुरेखा प्रभाकर कोळंबे यांच्या गळ्यातील सुमारे चार तोळे वजनाचे मंगळसूत्र गळ्यातून अलगद लांबवत पळ काढला. महिलेने आरडा-ओरड करताच काही नागरीक चोरट्यांच्या मागे धावले मात्र चोरटे मामाजी टॉकीजकडून पळण्यात यशस्वी झाले. यावेळी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी संदीप राजपूर व सुनील पाटील यांनीही चोरट्यांचा पाठलाग केला मात्र त्यांनाही त्यांनी हुलकावणी दिली. पल्सरवर आलेल्या एका चोरट्याच्या डोक्यात हेल्मेट होते तर पाठीमागे बसलेल्या चोरट्याने तोंडावर काळे मास्क लावल्याने त्यांचे चेहरे ओळखता आले नाहीत. दरम्यान, 31 जानेवारी रोजी गजानन महाराज नगरात सुवर्णा पाटील यांच्या गळ्यातील पोत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने लांबवण्यात आली होती तसेच बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुकाराम नगरात दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास पत्ता विचारण्याच्या बहाण्यानेच प्रेरणा गजानन चव्हाण यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवण्यात आले होते.

