मराठा समाजातर्फे शिवजयंती निमित्ताने विविध कार्यक्रम
15 रोजी विविध स्पर्धांचे आयोजन : 19 रोजी सकाळी भव्य रॅली निघणार
भुसावळ : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर व्हावेत व विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण व कला यांना चालना मिळण्यासाठी मराठा समाज भुसावळ व श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार, 19 फेब्रुवारी शिवजयंती उत्सव निमित्त सामाजिक उपक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
स्पर्धा शनिवार, 15 फेब्रुवारी या दिवशी भुसावळ मधील शाळांमध्ये घेण्यात येतील. या स्पर्धांसाठी निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, शोभायात्रेतील रथ सजवणे असे विषय आहेत. .
सहभागासाठी विद्यार्थ्यांना आवाहन
स्पर्धांमध्ये सहभाग घेणार्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय असे पारितोषिक देण्यात येईल. सोबतच भुसावळ शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा जिवंत देखावा व त्या काळातील वेशभूषा धारण करून रथ सजवणे व तो सुशोभित करून या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. या संबंधीचे पत्र सर्व शाळांना देण्यात आलेले आहे.
रक्तगट व दंत तपासणी शिबिर
सोमवार, 17 फेब्रुवारी या दिवशी मोफत रक्तगट तपासणी शिबिर दुपारी 12 ते 5 वेळेत म्युन्सीपल हायस्कूलसमोर होणार आहे. शिबिर सहाय्यक डॉ.योगेश पाटील तर चौधरी ल्यॉब मनोज चौधरी व राकेश उदासी यांच्या सौजन्याने होणार आहे. मंगळवार, 18 फेब्रुवारी रोजी मोफत दंत तपासणी शिबिर दुपारी एक ते चार या वेळेत म्युन्सीपल हायस्कूलसमोर होणार आहे. शांती डेंटल केअरचे डॉ.तुषार पाटील यांच्या सौजन्याने हे शिबिर होणार आहे. बुधवार, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती चषक कराटे स्पर्धा सकाळी आठ ते सायंकाळी सहा दरम्यान होईल. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भुसावळ स्पोर्ट्स अकॅडमी व जी तोकु काई कराटे महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे. लोणारी समाज मंगल कार्यालय, जळगाव रोड येथे ही स्पर्धा होईल.
पारंपरीक पद्धत्तीने जयंती साजरी होणार
बुधवार, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती पारंपरीक पद्धतीने साजरी करण्यात येईल. शिवजयंतीची रॅली ही सकाळी 10 वाजेला छत्रपती शिवाजी महाराज नगरापासून निघेल. अधिक माहितीसाठी प्रमोद अरुण पाटील 8956606008,
सचिन पाटील 7304017217 यांच्याशी संपर्क साधण्याचे आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन मराठा समाज अध्यक्ष किरण पाटील यांनी केले आहे.

