प्रदूषणबाधीत वरणगाव शहराला पुन्हा सीएसआर निधीतून वगळले


राजकीय द्वेषापोटी वरणगावकरांवर अन्याय : नगराध्यक्ष सुनील काळे यांचा आरोप

भुसावळ : दीपनगर वीजनिर्मिती केंद्राने राखाड व प्रदूषणबाधीत वरणगाव शहराला पुन्हा 2019 च्या सीएसआर निधीतून वगळले असून महाजनको दीपनगर वीजनिर्मिती केंद्राने प्रदूषणबाधीत 17 गावांना तीन कोटी 72 लाख मंजूर केल्याचा आनंद असला तरी सीएसआर योजनेच्या निधीतून राखाडबाधीत वरणगावला राजकीय द्वेषापोटी वगळण्यात आल्याचा आरोप नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केला आहे. या संदर्भात महानिर्मितीच्या व्यवस्थापकीय संचालक शैला ए. तसेच प्रकल्प संचालक थंगपंडीयन यांच्याकडे तक्रार करून न्यायाची मागणी करण्यात आली.

गतवर्षी झाला होता वरणगावकरांवर अन्याय
मागच्या वर्षाच्या निधीत सुद्धा वरणगाव शहर हे प्रकल्पबाधीत सीमेच्या आत येत असतांना मुद्दामहून वगळण्यात आले होते व त्यावेळीदेखील तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली होती. महाजन यांनी तत्कालीन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगून वरणगाव शहराला सीएसआरचा निधी देण्याच्या सूचना केल्या होत्या. वरणगाव हे दीपनगर वीजनिर्मिती केंद्राच्या आठ किलोमीटरच्या परीक्षेत्रात आत येऊन सुद्धानिधी वाटपात वरणगाव शहराला वगळण्यात आले होते. 2015 मध्ये वरणगाव शहरात सीएसआर योजनेंतर्गत मकरंद नगर भागात रस्त्यांची कामे झाली होती मात्र आता पुन्हा वरणगावकरांना वगळण्यात आल्याने शहरवासीयांवर झालेला एक प्रकारचा हा अन्याय आहे. प्रकल्पाचे प्रदूषण वरणगावकरांनी सहन करायचे, नवीन प्रकल्पात रोजगार देतांना शहराबाहेरील लोकांना द्यायचा मात्र प्रदूषण होत असताना त्यावर उपाययोजना करायची नाही ही बाब चुकीची असल्याचे नगराध्यक्षांनी म्हटले आहे.

तर तीव्र आंदोलन -नगराध्यक्ष
प्रकल्पबाधीत वरणगाव शहराला सीएसआर निधी देण्यात यावा अन्यथा दीपनगर वीजनिर्मिती केंद्राच्या विरुद्ध जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेविका माला मेढे, नसरीन बी.साजीद कुरेशी, नगरसेविका मेहनाजबी पिंजारी, शशी कोलते यांनी दिला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !