फैजपूर पालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापनासाठी जेसीबीची खरेदी
फैजपूर : नगर परीषदेने स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत फैजपूर शहरासाठी मंजूर असलेल्या कामांमध्ये नगरपालिकेच्या कामांसाठी नवीन जेसीबी खरेदी केला असून त्याचे शुक्रवारी सायंकाळी नगराध्यक्ष महानंदा होले यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. शहरातील विविध विकासकामे तसेच पाईप लाईन खोदकाम, गटारी नाले काढणे आदी कामांसाठी पालिकेला या जेसीबीची आता मदत होणार आहे. यापूर्वी पालिकेच्या विविध विकास कामांसाठी बाहेरून भाडेतत्त्वावर जेसीबी उपलब्ध करावे लागत असल्याने त्याचा खर्च मोठ्या प्रमाणावर होत होता. स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत 18 लाखांचे जेसीबी पालिकेने मंजूर केल्याने विकासकामे करताना त्याची मदत होणार आहे. प्रसंगी उपनगराध्यक्ष रशीद तडवी, भाजप गटनेते मिलिंद वाघूळदे, जिल्हा दूध संघ संचालक तथा नगरसेवक हेमराज चौधरी, आरोग्य सभापती शेख नशीबा शेख इरफान, प्रभाकर सपकाळे, देवेंद्र बेंडाळे, देवेंद्र साळी, शेख अबीद सर यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते.
