ठाण्यातील व्यापार्याला दोन कोटींमध्ये गंडवणार्या आरोपींना पोलिस कोठडी
खंडवा : मुंबईतील मालाडमधील व्यापार्याला कर्ज देण्याच्या नावाखाली दोन कोटींमध्ये गंडवत पवन एक्स्प्रेसने बिहारकडे पसार होणार्या विनोदकुमार झा (48) आणि अमितकुमार यादव (26, रा. दोघेही दरबंगा, बिहार) या आरोपींना खंडवा लोहमार्ग व खंडवा आरपीएफने शिताफीने अटक केली होती. आरोपींचा ठाणे क्राईम ब्रँचने ताबा घेतल्यानंतर त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोन कोटींची रोकड घेवून आरोपींचा पोबारा
मुंबईतील मालाड येथील रहिवासी अक्षय परवडी यांना सहा कोटी रुपयांचे कर्ज तत्काळ मिळवून देतो, असे सांगत आरोपी विनोदकुमार झा याने बँकेत सुरक्षा अनामत ठेवण्यासाठी दोन कोटींची रक्कम घेतली व ती बँकेत भरणा करण्याचा बहाणा करून आरटीजीएसची पावतीही देतो, असे सांगत परवडी यांचा विश्वास संपादन केला होता मात्र आरोपी पावती घेवून परत न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर परवडी यांनी क्राईम ब्रँचकडे तक्रार केली होती तर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी तपासाबाबत तातडीने सूत्रे हलविली. आरोपी डाऊन पवन एक्स्प्रेसच्या एसी डब्यातून बिहारकडे पलायन करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर खंडवा लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाला सूचित करण्यात आल्यानंतर आरोपींच्या बुधवार, 12 रोजी रात्री 9.30 वाजता आरोपींना रोकडसह ताब्यात घेण्यात आले होते. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी दोघा ताब्यात घेतल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांच्या पथकाने 14 फेब्रुवारी रोजी त्यांना अटक केली तर न्यायालयाने आरोपींना 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

