लग्नातून दागिने लांबवणार्‍या मध्यप्रदेशातील आरोपींना नागपूरात बेड्या


नागपूर : नागपूरातील गुन्हे शाखेने मध्यप्रदेशातील सिसोदीया टोळीच्या मुसक्या आवळल्यात आहेत. लग्नसमारंभात सोन्याचे दागिने लांबवण्यात या टोळीचा हातखंडा आहे. सन्नी हरिप्रसाद छायल (32), मोहित महेंद्र सिंग (26) आणि बबाबाई निरंजन सिसोदिया (45), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख रक्कम, सोने आणि हिजयाच्या दागिन्यांसह पाच लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छोट्या मुलांचा वापर करून ही टोळीकडून गुन्हे केले जात होते. घरातील लग्नसोहळ्यात सुटाबुटात या टोळीतील आरोपी सहभागी होत असल्याने कुणालाही त्यांच्यावर संशय येत नव्हता.केवळ सीसीटीव्ही फुटेजवरून या टोळीचा माग काढून त्यांना ताजबाग परीसरातून पोलिसांनी अटक केली.

सात गुन्हे उघड
सोमवारी या टोळीला न्यायालयात हजर करून त्यांचा पीसीआर मिळविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त भरणे यांनी सांगितले. ही टोळी देशातील विविध प्रांतात अशाच प्रकारे चोरी करते. लहान मुलगा आणि महिला सोबत असल्याने त्यांना राहण्याचे ठिकाण सहजपणे उपलब्ध होते. ठिकठिकाणी चोरी करूनही ही टोळी पकडली जात नाही. कारण ते लगेच दुसर्‍या ठिकाणी निघून जातात मात्र आम्ही या टोळीचा सातत्याने माग काढत होतो. त्यामुळे टोळीचा छडा लागला, असे गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त किशोर जाधव म्हणाले. या टोळीकडून सीताबर्डीतील गुन्ह्यासह लकडगंजमधील चार तसेच कळमना आणि गिट्टीखदानमधील प्रत्येकी एक असे एकूण सात चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याचेही एसीपी जाधव म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !