हिंगणघाट घटनेचा निषेध ; आरोपीला फाशी द्या
भुसावळातील सखी श्रावणी महिला संस्थेचे प्रांताधिकार्यांना निवेदन
भुसावळ : शहरातील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे हिंगणघाट येथील पीडितेला श्रद्धांजली वाहून निंदणीय घटनेचा निषेध करण्यात आला तसेच या घटनेतील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी प्रांताधिकार्यांकडे लेखी निवेदनाद्वारे सोमवारी करण्यात आली.
आरोपीला द्या भर चौकात फाशी
हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला तत्काळ भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली शिवाय फाशी दिल्यानेच पीडीतेला खर्या अर्थाने न्याय मिळेल, अशी भावनाही व्यक्त करण्यात आली. प्रसंगी पीडीतेला श्रद्धांजली वाहून पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजीरवाणी ही बाब असल्याचे सांगून त्या काळ्या दिवसाचा याचा तीव्र निषेध करण्यात आला. महिलांवरील अत्याचाराच्या घटना टाळायच्या असतील, तर न्यायव्यवस्थेने अशा खटल्यांचा जलद न्यायनिवाडा करून नराधमांना कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यात असे कृत्य करायची कुणाची हिंमत होणार नाही शिवाय पीडितेच्या कुटुंबियाना आर्थिक मदत देवून न्याय द्यावा, अशीही
मागणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे, माया चौधरी, भाग्यश्री नेवे, पत्रकार उज्ज्वला बागुल,
राधिका वाणी, पूजा नेवे, अनुराधा टाक, अंजली नेवे, आराधना टाक, प्रतिभा विसपुते, अॅड.कल्पना टेमाणी, नीलिमा चौधरी यांच्यासह संस्थेच्या सदस्या उपस्थित होत्या.

