‘त्या’ वक्तव्यानंतर हभप इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी
ओझर बु.॥ : इंदोरीकर महाराज यांच्या अपत्यप्राप्तीसाठी सम-विषम तिथीच्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अखेर दिलगिरी व्यक्त करणारे पत्रक मंगळवारी जाहीर केले आहे. आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी या पत्रकात म्हटलं आहे. ओझर इथे आपल्या कीर्तनात ’स्त्रीसंग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी समितीने त्यांना नोटीस बजावली होती.
मी वारकरी सांप्रदायाचा पाईक!
मी वारकरी सांप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षांच्या कीर्तनरुपी सेवेत समाजप्रबोधन, समाजसंघटना, अंधश्रद्धा निर्मूलन व विविध जाचक रुढी परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तनरुपी सेवेतील या वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो व माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे ही सदिच्छा या आशयाचा मजकूर असलले पत्रक महाराजांनी काढले आहे.


