नोकरीच्या सर्वाधिक संधी ग्रामीण महाराष्ट्राच्या अभियंत्यांना
आशिष चौधरी : भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यान
भुसावळ : देशभरात 2019 मध्ये उद्योग क्षेत्रातून नोकरी देण्याच्या सर्वाधिक शक्यता (हायरिंग अॅक्टिव्हिटी) महाराष्ट्राच्या असल्याचे दिसून आले आहे, उद्योजकांनी ग्रामीण भागात शिकत असलेल्या अभियंत्यांना जास्त संधी दिल्या कारण ते मेहनती असतात. गुगलसारख्या मोठ्या विभागात काम करण्यासाठी नवनवीन कौशल्य आत्मसात असलेल्या अभियंत्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, त्यासाठी मेहनत करणे तेव्हढेच आवश्यक आहे, असे प्रतिपादन भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवारी गूगलमध्ये कार्यरत असलेले आशिष चौधरी यांनी केले. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, दिशा फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश भंगाळे, दीपक कोलते, विभाग प्रमुख डॉ.गिरीष कुलकर्णी, प्रा. आय.डी. पॉल, प्रा.राममोहन अग्रवाल व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
उद्योगक्षेत्रांत वाढलेल्या अपेक्षांमुळे कौशल्यपूर्ण तरुणाला संधी
आशिष चौधरी म्हणाले की, कॉम्प्युटर सायन्सबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकॉम, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखांच्या कौशल्यपूर्ण विद्यार्थ्यांना गूगलमध्ये संधी निश्चित मिळते. प्लेसमेंटची तयारी करताना अभ्यासक्रमातील विविध विषयांची तयारीही तितकीच महत्त्वाची आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर चांगली प्लेसमेंट मिळणे हे संपूर्णपणे आपल्या स्वत:च्या मेहनतीवर अवलंबून आहे. आजचे युग स्पर्धात्मक आहे आणि म्हणून यश मिळवण्यासाठी स्वत:ची क्षमता वाढवणे हा एकमेव पर्याय आहे. याला कोणताही शॉर्टकट नाही. अधिक क्षमता असणार्या मुलांना नोकरी मिळविण्यास अधिक कष्ट घ्यावे लागत नाहीत परंतु मध्यम बुद्धीच्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागतो. उद्योगक्षेत्रांत वाढलेल्या अपेक्षांमुळे कौशल्यपूर्ण तरुणाला लवकर स्वीकारले जाते, अशी माहिती आशिष चौधरी यांनी दिली.
महाविद्यालयातील उपक्रम आत्मविश्वास वाढवतात -डॉ.सिंह
महाविद्यालयात जे विविध उपक्रम चालवले जातात यामध्ये सहभागी व्हायला हवे. अनेक संस्थांमध्ये परीसंवाद, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रम आत्मविश्वास वाढवतात. विद्यार्थ्यांची मेहनत घेण्याची तयारी असेल तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगल्या संधी प्राप्त करू शकतात, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी मांडले.

