पोलीस अधिकार्यांच्या मिरवणुका काढण्यासह फेटे बांधण्यावर लागणार अंकुश
Restrictions will be imposed on processions of police officers and tying of feta मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नुकत्याच काढलेल्या परीपत्रकानुसा पोलीस अधिकार्यांच्या बदलीनंतर त्यांना निरोप देताना जीपमधून मिरवणूक काढण्यासह फेटे बांधण्यावर आता बंदी घालण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांनी याबाबत एक परीपत्रक काढले असून अशा स्वरूपाचे कृत्य घडल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
हा प्रकार पोलीस दलाला शोभणारा नाही
प्रसिद्धी पत्रकात रश्मी शुक्ला यांनी नमूद केले आहे की, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध दर्जाच्या पोलीस अधिकारी/अंमलदार यांची शासन नियमानुसार तसेच प्रशासकीय कारणास्तव बदल्या होणे ही नित्याची बाब आहे. अशा एका घटकातून /ठिकाणाहून दुसर्या घटकांत/ठिकाणी बदली झालेल्या पोलीस अधिकारी यांच्या सन्मानार्थ विविध पोलीस ठाणे/शाखांमध्ये निरोप समारंभ आयोजित केले जातात.


अशा समारंभांमध्ये संबंधित पोलीस अधिकारी हे पोलीस गणवेश परिधान केलेला असतांना त्यावर रंगीत फेटे बांधणे, त्यांच्यावर फुलांचा अति प्रमाणात वर्षाव करणे, त्यांना वाहनात बसवून संबंधित पोलीस ठाणे/शाखेच्या अधिकारी/अंमलदार यांनी वाहनास दोरीने ओढत नेणे असे प्रकार निदर्शनास आले आहेत. तसेच त्यांना शासकीय वाहनात बसवून सेवानिवृत्त होणा-या अधिकार्यांसारखा त्यांना निरोप दिला जाणे हे प्रकार पोलीस दलाच्या प्रमाणित कार्यपध्दतीला अनुसरुन नाही.
हा प्रकार तर उपहासाचा
अशा प्रकारच्या गौरव सोहळ्याचा कार्यक्रम अधिकारी स्वतः किंवा त्यांच्या हस्तकामार्फत प्रसिध्दी मिळविण्यासाठी सोशल मीडियावर प्रसारीत करतात. त्यामुळे उलट ते जनमाणसांत चेष्टेचा, उपहासाचा विषय बनतात. स्थानिक नागरीक हे अधिकार्याने केलेल्या चांगल्या कामांचा, कर्तृत्वाचा नेहमी सन्मान करतात, न की अशा दिखाव्याचा. सर्व पोलीस घटक प्रमुखांनी त्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये/शाखांमध्ये बदली झालेल्या पोलीस अधिकारी यांच्या बदलीचा निरोप समारंभ आयोजित करताना वरील प्रकार होणार नाहीत, याची कटाक्षाने दक्षता घेणे आवश्यक आहे.
तशा सूचना त्यांचे अधिनस्थ सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी, सर्व पर्यवेक्षीय अधिकार्यांना सक्त सूचना देणे आवश्यक आहे. उपरोक्त सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास/पालन करण्यात कसुरी केल्यास संबंधितांविरुध्द कडक कारवाई करण्याची जबाबदारी सर्व घटक प्रमुख व त्यांचे पर्यवेक्षीय अधिका-यांची असेल. तसेच अशी कुठलीही बाब पोलीस मुख्यालय यांच्या निदर्शनास आली, तर संबंधित घटक प्रमुखांना जबाबदार ठरविले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.