श्री क्षेत्र मेहूण तापी तीरी सुमारे 70 दिंड्यांचा गजर
मुक्ताईनगर : दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीच्या महापर्वावर मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र मेहुण तापीतीर येथील आदिशक्ती श्रीसंत मुक्ताई तिर्थक्षेत्राला महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशातील सुमारे 70 दिंड्या हजारो भाविकांसह दाखल झाल्या. संत मुक्ताईंचे गुप्तस्थान मेहुण तापीतीर मुक्ताई भक्तीच्या मळ्याने फुललेले दिसत आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम व मुक्ताई शरणम्च्या जयघोषाने मेहूण तिर्थक्षेत्र दुमदूमत आहे.
महाशिवरात्री महोत्सवास प्रारंभ
श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथे मंगळवार, 18 ते शनिवार, दि. 22 फेब्रुवारी 2020 दरम्यान महाशिवरात्री महोत्सवास प्रारंभ झाला. महाशिवरात्री महोत्सवासाठी महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून तसेच आजुबाजूच्या राज्यातील दिंड्यांचे आगमन मंगळवार, 18 रोजी दुपारी 12 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत ज्ञानोबा माऊली तुकाराम, मुक्ताई शरणम् मुक्ताई शरणम्, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई एकनाथ नामदेव तुकारामम या जयघोषात, पावल्या टाकत मोठ्या जल्लोषात झाले. तत्पूर्वी या दिंड्या मेहूण-चिंचोल येथे आल्या असता तेथे श्रीयज्ञेश्वर आश्रमातर्फे शारंगधर महाराज मेहूणकर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर चिंचोल ग्रामस्थातर्फे सर्व दिंड्यांमधील हजारो पायी वारकर्यांना श्रीराम मंदिरासमोर भोजन देण्यात आले. त्यानंतर या दिंड्या श्रीक्षेत्र मेहूणकडे रवाना झाल्या. या दिंड्यांचे स्वागत श्रीक्षेत्र मेहूण देवस्थानातर्फे करण्यात आले. संत मुक्ताईंच्या मंदीराला प्रदक्षिणा घालून व तापीमातेचे तिर्थ घेत एकेका दिंडीतील भाविकांनी आदिशक्ती संत मुक्ताईंचे दर्शन घेतले. त्यानंतर दिंड्या नेमून दिलेल्या ठिकाणी विसावल्या. सायंकाळच्या सुमारास मंदिराला प्रदक्षिणा घालत सर्वच दिंड्यांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा गजरात आसमंत दणाणून सोडला. दिंडीतील भाविक अभंगाचे गायन, तालावर पावली, हरिपाठ आणि गवळणी व भजने म्हणत महोत्सवाचा आनंद लुटत होते. भागवत एकादशीला संत मुक्ताईंचे दर्शन म्हणजे प्रति विठ्ठलाचे दर्शन मानले जाते. पांडुरंग विठ्ठल पावले, आई मुक्ताईंचे दर्शन लाभले, अशी हजारो भाविकांची भावना आहे. हा उत्सव 22 फेब्रुवारी 2020 पर्यंत चालणार असून काल्याच्या कीर्तनाने उत्सवाचा समारोप होणार आहे. संपूर्ण महाशिवरात्रोत्सवात दिंडीचालकांची कीर्तने होणार आहे. बुधवार, 19 रोजी पहाटे श्रीसंत मुक्ताईंचा महाभिषेक, महापूजा व महाआरती करण्यात येणार आहे. एकादशीनिमित्त मेहूण-चिंचोल ग्रामस्थांतर्फे मोफत फराळाचे वाटप करण्यात येणार आहे.



