भुसावळातील निराधार व वंचितांच्या चेहर्यावर फुलले हास्य
सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुपच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक
भुसावळ : जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा
या संत तुकाराम महाजारांच्या अभंगाशी सुसंगत कार्य औरंगाबादच्या सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुपने शहरात करीत शहरवासीयांच्या मनात घर केले. छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील रेल्वे स्थानक व बसस्थानक परीसरातील गरीब, निराधार व बेवारस तसेच मनोरूग्ण असलेल्या नागरीकांनी अंघोळ घालून त्यांची दाढी, कटींग करण्यात आली तसेच त्यांना नवे वस्त्रही प्रसंगी देण्यात आले. गेल्या अनेक वर्षानंतर घडलेल्या या प्रकाराने वंचितांच्या चेहर्यावरही हास्य फुलल्याचे दिसून आले.
माणुस म्हणून जगा
समाजसेवक सुमित पंडित यांनी बुधवारी सकाळी शिवजयंती निमित्ताने शिवाजी महाराज यांचे दर्शन घेऊन या उपक्रमाला सुरुवात केली. रेल्वे स्टेशन, बस स्थानक परीसरात असणार्या बेवारस, निराधारांकडे जावून त्यांची दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ घालत त्यांना नवीन कपडेही परीधान करण्यात आले तर खर्या अर्थाने माणुस म्हणून जगण्याचे कार्य घडल्याने भुसावळकरांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले. याप्रंगी दत्तुभाऊ खोडे, डी.एस.चौधरी, पंडित सनके, संजय बोरसे, गजानन क्षीरसागर, कमलाकर माळी चेतन पाटील आदींची उपस्थिती होती.



महाराष्ट्रभरात उपक्रम
महाराष्ट्रातील बेवारस निराधार अवस्थेत फिरणार्या भिकार्याला दहा रुपये देण्याऐवजी ते हरवले असत्यास त्यांना त्यांच्या घरी सोडा, त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करा, त्यांना कामाला लावा तसेच त्यांची दाढी-कटींग करून त्यांना कपडे देण्याचा उपक्रम महाराष्ट्रभर सुरू असून जोपर्यंत जिवंत आहे तो पर्यंत हा उपक्रम सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार समाजसेवक सुमित पंडित यांनी व्यक्त केला.

