भुसावळातील हंबर्डीकर चौकातील काबरा मेडिकल फोडले
तीन हजारांच्या रोकडवर डल्ला : चोर्या वाढल्याने व्यावसायीकांमध्ये घबराट
भुसावळ : शहरातील पुखराज प्लॉझा कॉम्प्लेक्स परीसरात आठ दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच गजबजलेल्या व शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या हंबर्डीकर चौकातील राजाभाऊ काबरा यांचे काबरा मेडिकलचे शटर उचकवून चोरट्यांनी सुमारे तीन हजारांच्या चिल्लरसह काही चांदीचे शिक्के लांबवल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नसलातरी वाढत्या चोर्यांमुळे व्यावसायीकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
गस्ती पथकालाच लक्षात आली चोरी
शहर पोलिस ठाण्याचे गस्तीपथक बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास गस्तीवरून परतत असताना हंबर्डीकर चौकातील काबरा मेडिकलचे शटर त्यांना उचकावल्याचे आढळले. चोरट्यांनी मेडिकलच्या कुलूपांना हात न लावता लोखंडी टॉमीचा वापर करून शटर उचकावत गल्ल्यातील सुमारे तीन हजारांची रोकड व तीन चांदीचे पूजेसाठी असलेले शिक्के लांबवले. शहर पोलिसांनी याबाबत काबरा यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेतली.



