शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच !
भाजपावर प्रेम करणार्या शिक्षण विभागातील दोषींवर कारवाईची मागणी
भुसावळ : एरव्ही शिक्षणाचे डोज पाजणार्या शिक्षण विभागालाच सामान्य ज्ञानाचे धडे देण्याची वेळ आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतरही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या व उच्च शिक्षण संचनालयाच्या संकेत स्थळावर अद्यापही मुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपदी दर्शवण्यात आले आहे. भाजपावर प्रेम करणार्या शिक्षण विभागातील दोषींवर कारवाईची मागणी युवा सेना शहर प्रमुख सुरज पाटील यांनी केली आहे.
शिक्षण विभागाचे अद्यापही ‘भाजपा प्रेम’
युवा सेना शहर प्रमुख सुरज पाटील यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व उच्च शिक्षण संचलनालय यांच्या संकेतस्थळावर अद्यापपर्यंत जुनीच माहिती कायम असून ती अपडेट करण्यात आली नसल्याने नागरीकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. ज्ञानाचे धडे देणार्या शिक्षण विभागाला मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री कोण आहे? हे माहीत नसेल तर ही गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. सत्तापालट होऊनही शिक्षण विभाग हा भाजप प्रेमातून बाहेर पडला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या व उच्च शिक्षण संचलनालयाच्या संकेतस्थळावर आजही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर शिक्षणमंत्री म्हणून विनोद तावडे यांना दर्शवण्यात आली आहे शिवाय आयुक्त, सचिवपदीही जुन्याच अधिकार्यांची माहिती आहे. विशेष म्हणजे संकेतस्थळावर अजूनही सायन्स विभागाच्या 11 वी व 12 वीचा अभ्यासक्रम जुनाच असून अनुदानीत महाविद्यालयातील खाजगी शिकवणी घेणार्या शिक्षकांसाठी तो अपलोड करण्यात आलेला नाही. दरम्यान, युवासेना भुसावळतर्फे शहर प्रमुख सुरज पाटील यांनी तक्रार केली होती शिवाय संकेतस्थळावरील माहिती अपडेट करण्यासाठी आपण कर्मचार्यांना सांगितले मात्र एक आठवडा उलटूनही त्यात बदल दिसून न आल्याने या प्रकाराला दोषी असलेल्या अधिकार्यांवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी युवासेना भुसावळतर्फे करण्यात आली आहे.



