बीएसएनएच्या विस्कळीत सेवेला खाजगी इंटरनेट सेवेचा पर्याय
खासदार रक्षा खडसे यांची जिल्हाधिकारी प्रशासनाशी चर्चा
भुसावळ : बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे शासकीय कार्यालयासह बँका व अन्य सरकारी कार्यालयांच्या विविध विभागात कामे ठप्प होत असल्याने शेतकरी, नागरीक, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असल्याच्या तक्रारी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे आल्या होत्या. या संदर्भात खडसे यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व जिल्ह्याचे लीड बँक मॅनेजर यांच्याशी चर्चा करीत बीएसएनएलची सेवा वारंवार विस्कळीत होत असल्यास यावर पर्याय म्हणून खाजगी इंटरनेट सेवा वापरण्याची सूचना केली आहे.
लाखोंचे व्यवहार झाले ठप्प
जिल्ह्यातील बीएसएनएलची इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी, नागरीकांचे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प होत आहेत. जिल्ह्यात बहुतांश बँकांचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने चालतात शिवाय इंटरनेट सेवा बंद पडली तर बँकांचे व्यवहार पूर्णपणे ठप्प होतात. जिल्ह्यात बीएसएनएलचे मोठे जाळे असून बहुतांश ठिकाणी बीएसएनएलचे कनेक्शन आहेत. ही सेवा वारंवार खंडित झाल्यामुळे बँकेच्या व्यवसायावर परीणाम होत आहे. शाळा, महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आल्या आहेत. शेवटच्या फेरीसाठी बँकेत डीडी काढण्यासाठी आलेले विद्यार्थी व पालक ताटकळत आहेत शिवाय सध्या शेतीच्या कामांची लगबग चालू असून शेतकर्यांना पैश्याची गरज भासते व लांबच्या ठिकाणाहून आलेले शेतकर्यांना शेतीची कामे सोडून दिवसभर बँकेत थांबत असल्याने त्यांनाही मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे.
बीएसएनएल सेवेबाबत प्रचंड तक्रारी
केंद्र व राज्यातील विद्यमान सरकारने डिजीटल इंडियाचा नारा दिला शिवाय बहुतेक व्यवहार ऑनलाईन केले जातात तसेच शासकीय कार्यालय असो वा बँका आणि खाजगी कार्यालयाचे कामकाज सुध्दा इंटरनेट सेवेवर अवलंबून असून बीएसएनएल इंटरनेट सेवा ठप्प झाल्यास सर्व व्यवहारांना ब्रेक लागत असल्याची तक्रारी खासदारांकडे आल्या होत्या.