भामलवाडी येथे बिबट्याचा धुमाकूळ : गायीचा पाडला फडशा
Leopard’s rampage at Bhamalwadi: Cow’s mauled खिर्डी : रावेर तालुक्यातील भामलवाडी येथे महादेव मंदिराजवळ बिबट्याने एका गायीचा फडशा पाडला. ही घटना 14 रोजी रात्री दिड ते दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. भामलवाडी येथील रहिवासी गणेश गोपाळ कोळी यांच्या गोठ्यात गाय बांधलेली होती परंतु रात्रीच्या वेळेस बिबट्याने गोठ्यात शिरून गायीचा फडशा पाडला.
पोलीस पाटील प्रमोद पाटील यांनी वन विभागाला माहिती कळवताच वनपरीक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या सूचनेनुसार वनरक्षक ए.एच.पिंजारी यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. ऐनपूर पशू वैद्यकीय अधिकारी ठवरे यांनी बिबट्याने हल्ला केल्याचे स्पष्ट केले. बलवाडी गावच्या काही शेतकर्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा होती तर या भागात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी तसेच ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळेस शेतात जाताना एकटे न जाता सामूहिक पद्धतीने जावे असे आवाहन, रावेरचे वन परीक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी केले आहे.


