अन्यथा झेडआरटीआय रस्त्याची दुरुस्ती रेल्वे युनियन करणार
रेल्वे युनियनच्या पदाधिकार्यांनी दिला पालकमंत्र्यांना इशारा
भुसावळ : शहरातील गांधी पुतळा, यावल नाका ते झेडआरटीआय अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाबाबत रेल्वेच्या विविध युनियच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. अंत्यत खडतर असलेला या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी गर्हाणे घातले. रेल्वे किंवा पालिकेने रस्त्याचा प्रश्न न सोडविल्यास युनियन दुरुस्ती करेल, असा इशारा यावेळी कर्मचार्यांनी दिला. शहरातील यावल नाका ते डीआरटीआय रस्त्याची स्थिती बिकट झाली आहे. या प्रश्नी शनिवारी रेल्वेच्या विविध यूनियन चे पदाधिकारी यांनी पालकमंत्री ग़ुलाबराव पाटिल यांची भेट घेवून रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश नगरपालिका मुख्याधिकारी किंवा रेल्वेच्या डीआरएम यांना द्यावे. तसेच हा रस्ता नेमका पालिकेचा का रेल्वेचा याबाबत सोक्षमोक्ष लावावा. याबाबतचे जिल्हाधिकार्यांकडून लेखी पत्र मिळावे, अशी मागणी केली. याबाबत गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकार्यांची चर्चा करतो, युनियनच्या पदाधिकार्यांनी त्यांची सोमवारी भेट घ्यावी, हा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, प्रीतम टाक ,सजंय चौधरी, एनआरएमयुचे रूपसिंग पाटिल, ललित भारंबे, राजकुमार गवळी, एससीएसटी असोसिएशनचे विशाल सपकाळे, समाधान हिवाळे, ओबीसी असोसिएशनचे महेश राणे व इतर पदाधिकारी हजर होते.
अन्यथा युनियन करेल दुरुस्ती
रेल्वे प्रशासन किंवा नगरपालिकेने या रस्त्याकडे लक्ष देवून दुरुस्ती न केल्यास रेल्वे कर्मचार्यांच्या सर्व युनियन मिळून या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करु, असा इशाराही यावेळी रेल्वे कर्मचार्यांच्या युनियनने दिला, मात्र यावर गुलाबराव पाटील यांनी ही वेळ येणार नाही. रस्त्याचे काम लवकरच होईल, असे आश्वासन दिले.
सात हजार कर्मचार्यांना त्रास
या मार्गाने रेल्वेचे तब्बल सात हजार कर्मचारी वापरतात. खडतर रस्त्यामुळे बहुतेक कर्मचार्यांना पाठीचे दुखणे सुरु झाले आहे. मात्र रेल्वे अधिकार्यांना कर्मचार्यांच्या आरोग्याबाबत देणेघेणे नाही. अधिकार्यांच्या बंगल्याकडील रस्ते मात्र चकाचक आहेत. एमओएच, पीओएच, सी अँड डब्लू आदींसह रेल्वेच्या अन्य विभागातील कर्मचार्यांना या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे, अशी शोकांतीका यावेळी रेल कामगार सेनेचे अध्यक्ष ललितकुमार मुथा यांनी मांडली.

