रावेरात पालिकेने जप्त केले 32 किलो प्लॅस्टीक
दोघा दुकानदारांकडून दहा हजारांचा दंड वसुल : कारवाईने खळबळ
रावेर : रावेर नगरपालिकेच्या प्लॅस्टीक बंदी विरोधी पथकाने शहरातील दुकानांची झाडाझडती घेऊन दोन दुकानांवर धाडी टाकत धडक कारवाई करीत 32 किलो बंदी असलेले दहा हजारांचे प्लॅस्टीक जप्त करण्यात आले. या कारवाईने चोरून प्लॅस्टीक विक्री करणार्यांमध्ये खळबळ उडाली. महाराष्ट्रात प्लॅस्टीक बंदी असलीतरी शहरातील काही दुकानांमध्ये चोरून प्लॅस्टीक विक्री होत असल्याची माहिती नगरपालिकेला मिळाल्यानंतर मुख्यधिकारी रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.के.तडवी, धोंडू वाणी, एस.एस.काळे, पांडुरंग महाजन, प्रमोद चौधरी, अतुल चौधरी, शेख जावेद, मयूर तोंडे, अशोक माळी यांच्या पथकाने शहरातील छोरीया मार्केटमधील बालाजी प्लॅस्टीक तसेच मेन रोडवरील निक्की ट्रेडर्स या दोन दुकानांमधून तब्बल 32 किलो प्लॅस्टीक जप्त करण्यात आले. दोघांना प्रत्येकी पाच हजाराचा दंड वसुल करण्यात आला. या दुकानदारांना सिंगल यूज प्लॅस्टीक न वापरण्याबाबत मार्गदर्शन सुध्दा केले जात आहे यामुळे रावेर शहरातील सर्व अनधिकृत प्लॅस्टीक विक्री करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली. रावेर शहरातील इतर दुकानांची सुध्दा झाडा-झडती घेण्यात आली. रावेर शहरात शासनाने नेमुन दिलेल्या कालावधीत कारवाई सतत सुरू राहणार आहे नागरीकांनी प्रतिबंधक असलेले प्लॅस्टीक वापरू नये, असे आवाहन पालिकेचे मुख्यधिकारी रवींद्र लांडे यांनी केले आहे.

