भीषण अपघातात धरणगाव तालुक्यातील तरुण ठार
A youth from Dharangaon taluk was killed in a terrible accident जळगाव : मुसळी ते चिंचपूरा गावाच्या दरम्यान कारचा भीषण अपघात झाल्यानंतर धरणगाव तालुक्यातील 18 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुदैवी घटना गुरूवार, 4 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. याअ अपघातात कारमधील किर्तनकार हे किरकोळ जखमी झाले. दरम्यान, अपघातात एकूलता एक मुलगा ठार झाल्याने नातेवाईकांनी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड आक्रोश केला. राज महेंद्र शिरसाट (18, रा.सार्वे, ता.धरणगाव) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अपघातात तरुणाचा मृत्यू
धरणगाव तालुक्यातील सार्वे गावात राज शिरसाट हा आपल्या आई आणि आजी-आजोबांसोबत वास्तव्याला होता. आई मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते तर राज शिरसाट हा शिक्षण घेत होता. त्यांच गावात त्यांचे मामा देखील राहतात. गुरूवार, 4 एप्रिल रोजी दुपारी राज शिरसाट हा त्यांच्याच गावातील किर्तनकार सुरेश अशोक अहिरे सार्वेकर महाराज यांच्या कार क्रमांक (एम.एच. 09 डी.एक्स. 8991 ) ने सार्वे गावातून जळगावला जाण्यासाठी निघाला.


दुपारी तीन वाजेच्या सुमारास चिंचपूरा ते मुसळी फाट्याच्या दरम्यान भरधाव वेगाने जात असतांना त्यांची कार अचानक झाडाजवळ फेकली गेली. या अपघातात राजचा जागीच मृत्यू झाला तर सार्वेकर महाराज हे जखमी झाले. रोडच्या बाजूला शाळेतील शिक्षक डी.के.पाटील यांनी अपघातस्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने कारमधून राजला बाहेर काढून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होताच मोठा आक्रोश केला.