डांभूर्णीतून दागिने लांबवले : आंतरजातीय विवाह करणार्या दाम्पत्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा
यावल : तालुक्यातील डांभुर्णी गावात सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या आंतरजातीय प्रेमविवाह प्रकरणातील दाम्पत्यासह सहा जणांविरुद्ध तरुणीच्या आजीने रोकडसह सोने चोरीची न्यायालयात फिर्याद दिल्यानंतर मंगळवारी उभयंतांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात राहणार्या नर्मदा सुधाकर कोळी (65) यांनी या प्रकरणी न्यायालयात फिर्याद नोंदवली होती. त्यांची नात नम्रता मोहन कोळी (18, रा.डांभुर्णी) हिच्यासह रोशन उर्फ रवींद्र गणेश भंगाळे (26), गणेश रामचंद्र भंगाळे (56), मुकुंदा गणेश भंगाळे (31), मंगला गणेश भंगाळे (52) व सोनी मुकुंदा भंगाळे (27, सर्व रा.डांभुर्णी) यांनी संगतमताने 27 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 12 वाजता फिर्यादीची नात नम्रता हिला भुरळ घालून तिचे लग्न जुळले असतानाही तिच्या मावशीने दिलेले दोन लाख 50 हजार रुपये किमतीचे 37 ग्रॅम वजनाची पोत तसेच चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, साडेबारा ग्रॅम वजनाची सोन्याचा नेकलेस व 22 हजार रुपये रोख रक्कम फिर्यादीच्या संमतीसह लांबवली. सहा आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
