वरणगावात वर्‍हाडींवर मधमाशांनी चढवला हल्ला


भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथे लग्नात आलेल्या वर्‍हाडींवर अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने लग्न समारंभात प्रचंड धावपळ उडाली. अनेक वर्‍हाडींवर वरणगाव हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वरणगाव येथील नागेश्वर मंदीर सभामंडप हॉलमध्ये कठोरा येथील भास्कर पाटील यांचा मुलगा दीपक याचा बल्लारशाह येथील मुलीशी मंगळवारी विवाह आयोजित करण्यात आला होता. या जागेत मधमाशांचे मोठे पोळ असून अचानक मधमाशा उठून लग्न समारंभामध्ये आलेल्या वर्‍हाडी मंडळींना चावल्यामुळे लग्न समारंभामध्ये एकच धावपळ उडाली. मधमाशांच्या हल्ल्यात वर्‍हाडी दिव्या पाटील (6, रा.चितोडा), सुरेखा कनाखे (50), राहुल राणे व विशाल पाटील (कठोरा), धीरज पाटील, सागर पाटील हे जखमी झाल्याने त्यांच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालय, भोईटे हॉस्पीटल व आदित्य हॉस्पीटल येथे उपचारासाठी हलवण्यात आले. सुमारे 15ते 20 वर्‍हाडींना मधमाश्यांनी चावा घेतल्याचे सांगण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !