कुलर सुरू करताना वीज धक्क्याने बालकाचा मृत्यू : किनोद गावात शोककळा
Child dies due to electric shock while switching on cooler : Mourning in Kinod village जळगाव : कुलर सुरू करत असताना विजेचा धक्का लागल्याने 12 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 12 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता किनोद गावात घडली. अक्षदा किशोर मोरे (12) असे मयत बालिकेचे नाव आहे.
विजेचा धक्का बसताच मृत्यू
किनोद, ता.जळगाव येथे अक्षदा ही आई आणि दोन बहिणींसह वास्तव्यास होती. तिचे वडील किशोर मोरे यांचे एक वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले आहे तर आई ही हातमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करते. शुक्रवार, 12 एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अक्षदाने कुलर सुरू करण्यासाठी विजेचे बटन दाबले मात्र त्याचवेळी तिला विजेचा जोरदार धक्का बसल्याने अक्षदा ही जोरात फेकली गेली.


कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी शेजारच्या नागरिकांच्या मदतीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले. तिथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी तिला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.