पत्नीसह मुलीचा खून करीत पतीची आत्महत्या : जामनेर तालुक्यातील घटना : कौटूंबिक वादातून उचलले पाऊल

0

First killed his wife and daughter due to family dispute, then killed himself : incident in Fatehpur taluka फत्तेपूर, ता.जामनेर : कौटूंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीसह नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा धारदार शस्त्राने खून केला व नंतर विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. ही घटना देऊळगाव गुजरी, ता.जामनेर येथे शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. प्रतिभा विशाल झनके (21) व दिव्या (9 महिने) असे खून झालेल्या माय-लेकीचे नाव आहे तर विशाल मधुकर झनके (28, दुधलगाव, ता.मलकापूर) असे आत्महत्या करणार्‍या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी फत्तेपूर पोलिसात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

धारदार शस्त्राने गळा चिरला
मयत आरोपी विशाल झनके व पत्नी प्रतिभा यांच्यात सुमारे तीन महिन्यांपासून कौटुंबिक वादातून खटके उडत असल्याने पत्नी नऊ महिन्यांची मुलगी दिव्याला घेवून माहेरी देऊळगाव गुजरी आल्या होत्या व हा राग डोक्यात ठेवून आरोपी शुक्रवारी दुपारी सासरवाडीला पोहोचला. मयत विवाहितेची आजी-आजोबा घरा-बाहेर खाटेवर बसलेले असताना आरोपीने टीव्हीचा मोठा आवाज करीत पत्नीसह मुलीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करीत आरोपीने त्यांची हत्या केली व बाहेर पडताना मेडीकल स्टोअरवर औषध घेण्यासाठी चालल्याचा बहाणा करीत दुधलगाव, ता.मलकापूर येथे मूळ गावी पोहोचला.

सायंकाळी आरोपीनेदेखील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. देऊळगाव गुजरी गावात दुपारच्या सुमारास माय-लेकीची हत्या घडल्याची घटना समोर आल्यानंतर गावात प्रचंड खळबळ उडाली. फत्तेपूर पोलीस ठाण्यात मयत आरोपी विशाल झनकेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड करीत आहे.


कॉपी करू नका.