खोकेवाल्यांचा हिशेब जनताच करेल ! : 4 जूननंतर यांना फिरणेही कठीण होणार !
खासदार संजय राऊतांची जळगावात टिका : पालकमंत्री गुलाबरावांवर चालवले टिकेचे बाण
जळगाव : दरवर्षी दीड कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा करून हे सरकार सत्तेवर आले मात्र दरवर्षी दीड लाख लोकांनाही युवकांनाही रोजगार दिला नाही. गद्दारी करून सत्तेवर आलेल्या या पक्षाला निष्ठावंतांची ताकद दाखवा व हुकूमशाही उलथवून टाका, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी येथे केले. जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टिका केली.
पालकमंत्र्यांवर साधला निशाणा
खासदार राऊत म्हणाले की, भाजप हा चोरांचा पक्ष आहे. पानटपरी वाल्याला बाळासाहेबांनी आमदार व मंत्री केले मात्र त्याला पुन्हा टपरीवर बसवायची वेळ आल्याचे त्यांनी सांगून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई गुजरातला पळवण्याचा डाव
आपल्या आक्रमक शैलीत खासदार राऊत म्हणाले की, मोदींना व अमित शहा यांना मुंबई गुजरातला पळवून न्यायची आहे म्हणूनच त्यांनी शिवसेना फोडली. यापुढे देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे. मग या खोके वाल्यांचा शांतपणे हिशोब करू. तुमचीच गॅरंटी नाही, अन् तुम्ही गॅरंटी देत आहात.
महाराष्ट्रात बेईमानी व गद्दारीला स्थान नाही. शिवाजी महाराजांच्या राज्यात खंडोजी खोपडेंचे हात कलम केले होते. त्याचप्रमाणे मतदार यांचा मतपेटीतून वध करतील व 4 जून नंतर यांना फिरणेही मुश्किल होईल, असेही ते म्हणाले.
रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील आणि जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
या नेत्यांचा शक्ती प्रदर्शनात सहभाग
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवतीर्थ मैदानावर जमलेल्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व त्यानंतर सजवलेल्या बैलगाडी व ट्रॅक्टरमधून श्रीराम पाटील आणि करण पाटील या दोन उमेदवारांसह शक्ती प्रदर्शन करीत रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाली. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड, उमेदवार श्रीराम पाटील, करण पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ.सतीश पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अॅड.रोहिणी खडसे, प्रसेनजीत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.