नवापूरातील लाचखोर पोलीस निरीक्षक वारे यांच्या घरात सापडले ‘25 लाखांचे घबाड’

न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी : 50 हजारांची लाच स्वीकारताना झाली कारवाई

0

25 lakhs” found in the house of bribe-taking police inspector Ware in Nawapur नवापूर : 50 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना नवापूर पोलीस ठाण्यातील निरीक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण वारे (49, फ्लॅट नंबर 6, बी विंग, आशर इस्टेट, उपनगर, नाशिक रोड, नाशिक) यांना नाशिक एसीबीच्या पथकाने बुधवारी सायंकाळी अटक केली होती. दरम्यान, नंदुरबार एसीबीने वारे यांच्या घराची झडती घेतली असता त्यात तब्बल 25 लाख 87 हजारांचे घबाड सापडल्यानंतर पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, निरीक्षक वारे यांना गुरुवारी नंदुरबार न्यायालयात हजार केल्यानंतर त्यांना तीन दिवसांची अर्थात 28 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पोलीस वाहनावर दगडफेक
दरम्यान, वारे यांच्यावर एसीबीचा टॅ्रप झाल्याची माहिती मिळाल्यानंतर नवापूरातील त्रस्त नागरिकांनी बुधवारी सायंकाळी पोलीस ठाण्याबाहेर येत रोष व्यक्त करीत किरकोळ दगडफेक केली. शहरातील तणावाची परिस्थिती पाहता नंदुरबार येथून तातडीने रात्रीच मोठी कुमक मागवण्यात आली होती.

असे आहे लाच प्रकरण
नवापूरातील 35 वर्षीय तक्रारदार यांच्याविरोधात सोनगड पोलीस स्टेशन, जिल्हा तापी, राज्य गुजरात येथे गुन्हा रजिस्टर नंबर 583/2023 प्रमाणे प्रोव्हीबिशनचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तापी एलसीबीचे पथक अलीकडे नवापूरात आल्यानंतर त्यांनी नवापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर वारे यांची भेट घेतली. या गुन्ह्यात आरोपीला अटक न होवू देण्यासाठी वारे यांनी अडीच लाखांची लाच मागितली व त्यावेळी 5 मार्च 2024 रोजी वारे यांनी एक लाख रुपये घेतले व त्यानंतर पुन्हा दिड लाखांची मागणी वारे यांनी केली. यावेळी नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर वारे यांनी 50 हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा रचण्यात आला. निरीक्षक वारे यांनी राहत्या घरातच 50 हजारांची लाच स्वीकारताच त्यांना एसीबीने अटक केली

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक (रीडर) नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

पोलीस वाहनावर दगडफेक : घर झडतीत आढळले घबाड
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या विरोधात संतप्त नवापूरातील काही नागरिकांनी बुधवारी सायंकाळी पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी एसीबीच्या वाहनावरही किरकोळ दगडफेक करण्यात आली. दरम्यान, निरीक्षक वारे यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वारे यांच्या घराची झडती घेतल्यानंतर त्यात 25 लाख 87 हजारांची रोकड सापडल्याची माहिती एसीबी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना दिली.


कॉपी करू नका.