सातार्‍याचे उमेदवार शशिकांत शिंदेंच्या अडचणी वाढल्या : 65 कोटींचे नुकसान प्रकरणी गुन्हा

0

सातारा : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सातार्‍यातील उमेदवार शशिकांत शिंदेंच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. कोरेगावमधील आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंवर मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी आरोप केल्यानंतर नवी मुंबईतील एपीएमसी पोलीस ठाण्यात शिंदे यांच्याविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. 24 संचालक आणि सचिव असे 25 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे.

उदयनराजे यांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला आहे. एपीएमसी मध्ये एफएसआय घोटाळा करून प्रशासनाचे 65 कोटींचे नुकसान केल्याचा आरोप शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे.

दरम्यान, माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा करण्याचा इशारा दिला आहे.

असे आहे नेमके प्रकरण
हे प्रकरण 2009 वर्षातील आहे. 2009 मध्ये मसाला मार्केटच्या 466 गाळेधारकांना अधिकचे बांधकाम करण्यासाठी 600 रुपये चौरस फुटाने परवानगी देण्यात आली. यावेळी रेडीरेकनरचा 3066 रुपये दर होता. यामुळे एपीएमसी प्रशासनाची 65 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

फळ मार्केट शौचालय टेंडर घोटाळ्यात शिंदे यांना आधीच जामीन मंजूर आहे तर उर्वरित संचालकांना अटक करण्यात आली. आताच्या नव्या घोटाळ्यात गुन्हा दाखल होत नव्हता. शौचालय टेंडर घोटाळ्यात दोन महिन्यांपूर्वीच शिंदेना जामीन मिळाला आहे तर संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली होती.

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्र
शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांची लढत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याशी होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी घडवून आणल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तुम्ही कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न करा पण आपण शरद पवारांची साथ सोडणार नाही, अशी भूमिका शशिकांत शिंदे यांनी मांडली आहे.

 


कॉपी करू नका.